ठाणे : जवळपास चारशे ते साडेचारशे फुटाचा हा सुळका असून गृहीता विचारे यांनी तो सहजरीत्या पूर्ण केला आहे. याआधी देखील गृहीता विचार यांनी हरिता विचारे या दोघी बहिणींनी माउंट एवरेस्ट बेस सर करत महाराष्ट्रातील पहिली मुलगी असल्याचा मान मिळवला होता. त्यानंतर आता त्यांनी अतिशय अवघड असा जीवधन किल्ल्याचा सुळका पार केला आहे. कोरोना काळामध्ये सुरू झालेली ही आवड या दोघींना वडिलांच्या मदतीने किल्ले सर करण्याची आवड देवून गेली.
गृहीताच्या कामगिरीचे समाजामध्ये कौतुक : गृहिता आणि हरिता या दोघी सख्या बहिणी आहेत. नऊवारी साडी परिधान करून या दोन्ही संख्या बहिणींनी ही पराक्रम केला आहे. ट्रेकिंग करायला आपल्याला आवडत असून अशा प्रकारच्या आधी आणखी किल्ले सर करणार असल्याचे गृहिता यांनी सांगितलेले आहे. गृहीताच्या याच कामगिरीने समाजामध्ये तिचे कौतुक केले जात असून घरातील आई-वडील यांचा देखील सपोर्ट असल्याचे गृहिता यांनी सांगितले आहे.
दोघींचे यश : आतापर्यंत या दोघी बहिणीनी जवळपास १८ ट्रेक पूर्ण केले आहेत. गिर्यारोहणाचे बाळकडू वडिलांकडून मिळाल्यानंतर या क्षेत्रात आवड निर्माण होऊन ट्रेकींगविषयी आत्मविश्वास वाढू लागला. त्याची परिणीती म्हणून उणे अंश तापमानाशी झुंज देत थंडगार बोचणारे वारे, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी या सर्व आवाहनांना सामोरे जात माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प १३ दिवसांत सर करण्यात यश मिळविले होते. काठमांडूपासून सुरू झालेल्या या प्रवासात बहिण हरिता आणि वडिल सचिन विचारे यांनी रामेछाप हा चार तासांचा विमान प्रवास सुरवातीला केला.
एवरेस्ट बेस कॅम्प सर : त्यानंतर या १४८ किलोमिटर ट्रेक करताना लुक्ला ते फाकडिंग ज्याचे अंतर २ हजार ८४३ मीटर उंच, नामचे बाजार ३ हजार ३४०, टिंगबोचे आदी टप्पे पार करत मानाचा रूरा म्हणजेच ५ हजार ३६४ मिटरचा एवरेस्ट बेस कॅम्प सर केला. परंतू या कठीण अशा प्रवासात गृहिताची बहिण हरिता विचारे हिला टिंगबोचे ३ हजार ८६० मीटर उंचीवर आजाराचा सामना करावा लागला. पुढील औषधासाठी हरिताला कमी उंचीवरून परत जावे लागले. मात्र दोघांनी माऊंट एव्हरेस्ट कॅम्पवर पोहचून फ्लॅग फडकावला आहे. दोघी बहिणींना आतापर्यंत दोन हजार ५९६ फूटाचा मलंगगडपासून ते महाराष्ट्रातील सर्वात उंच ५ हजार ४०० फूटावरचे कळसूबाई शिखर, कर्नाळा, विशाळगड, गोपाळगड, सुवर्ण दुर्ग आदी किल्ले यशस्वीपणे सर केले असल्याचे ही सचिन म्हणाले.