ठाणे - 'बयाणा'च्या (आगाऊ रक्कम) नावाने मजुरांची पिळवणूक करणाऱ्या वीटभट्टी मालकासह मुकादमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 आदिवासी मजुरांची वीटभट्टी मालकाच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, श्रमजीवी संघटनेचे शहर अध्यक्ष सागर देसक व सहकाऱ्यांनी मजुरांची सुटका केली.
हेही वाचा - भिवंडी पोलिसांकडून तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द
जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ४ गुन्ह्यानंतर नारपोली पोलीस ठाण्यात पुन्हा एक वीटभट्टी मालकावर आणि मुकादम या दोघांवर बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६ अन्वये तसेच अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे 5 ते 6 मजुरांची नाममात्र 'बयाणा' रकमेतून वीटभट्टी मालक 12 ते 15 तास राबवून पिळवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुरुनाथ चिंतामण सवरा (रा. गवतेपडा, ता. वाडा, जि. पालघर) या मजुराने नारपोली पोलीस ठाण्यात वीटभट्टी मालकासह मुकादमावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. जॉली नाईक शेठ (रा. अंजूरगाव, भिवंडी) असे गुन्हा दाखल झालेल्या वीटभट्टी मालकाचे तर मधुकर पवार असे मुकादमाचे नाव आहे.
गुरुनाथ चिंतामण सवरा (२८ रा. कासघर, ता. वाडा) आणि पत्नी गीता (वय-24), वैशाली राहुल पवार (वय-22, रा. गवतेपाडा, ता. वाडा) व तिची 3 मुले, लहू लक्ष्मण गायकवाड (वय-45 रा. सापरोंडे, वाडा) व त्याची पत्नी मंदा (वय-27) अशी वेठबगारीतून मुक्त झालेल्या मजुरांची नावे आहेत. तर दुसरीकडे बयाणा देऊन आदिवासी मजुरांना गुलामगिरीच्या पाशात अडकविण्याच्या अन्यायकारक प्रथेला श्रमजीवी संघटनेने प्रखर विरोध केला आहे.
सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार वेठबिगारीच्या बंधनातून सुटका झालेल्या मजुरांना केवळ 4 हजार रुपये बायाणा रक्कम गेल्या दिवाळीपूर्वी आरोपी मुकादम मधुकर पवार याने दिली होती. दिवाळी संपल्यावर वीटभट्टी मालक जॉली नाईक याने उचल दिल्याच्या नावाने त्या मजुरांना जबरस्तीने भिवंडी तालुक्यातील अंजुरगाव येथील वीटभट्टीवर घेऊन आला. या दरम्यान गणपती उत्सवानिमित्त काही मजूर सुट्टी घेऊन गेले. पुन्हा त्यांना बयाना देऊन वीटभट्टीच्या कामात जुंपले होते. आरोपी मालक हा केवळ 200 रुपयांच्या मजुरीवर या मजुरांना 12 ते 15 तास राबवून घेत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, या मजुरांपैकी राहुल पवार (वय-25, रा. गवतेपडा, ता. वाडा) याचा विटांची वाहतूक करताना अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला मालक जॉली नाईक याने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, राहुलची प्रकृती चितांजनक झाल्याने त्याला कळवा येथील शासकीय रुग्णालयात त्यांनतर मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र, या ठिकाणी त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे पतीला मारहाण करून आम्हाला बळजबरीने वेठबिगारी कामात जुंपल्याची तक्रार वैशाली पवार यांनी केल्याने वीटभट्टी मालक नाईक याच्याविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरिक्षक के. आर. पाटील करीत आहे.
हेही वाचा - शोरूमचा स्टॉक इंचार्जचा निघाला चोर; ४४ पैकी २७ मोटरसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश