ठाणे - जिल्ह्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी भिवंडी शहरात 5 तर ग्रामीण भागात 3 असे 8 नवे रुग्ण आढळले आहेत. या 5 नव्या रुग्णांसह भिवंडी शहरातील रुग्णांची संख्या 38 झाली असून यामध्ये 11 रुग्ण बरे झालेले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 26 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात 35 वर्षीय महिला व 29 वर्षीय पुरुष दोघे गोवंडी मुंबई येथून 10 मे रोजी आले होते. त्याच वेळी त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. तिसरा रुग्ण 55 वर्षीय पुरुष राजीव गांधी कामतघर येथील असून तो कोरोनाबाधित रुग्णाच्या सहवासात आल्याने शुक्रवारी त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. चौथा रुग्ण हा शहरातील नवी वस्ती येथील 37 वर्षीय पुरुष असून टीबी ट्रीटमेंट घेत होता. खासगी लॅबमध्ये कोरोना टेस्ट केली असता, त्याला लागण झाल्याचे समोर आले आहे. तर पाचवा रुग्ण 70 वर्षीय महिला असून त्या मुंब्रा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल असताना त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्या बंदर मोहल्ला येथील रहिवासी आहेत.
दरम्यान ग्रामीण भागातील पूर्णा, कशेळी व केवणी या तीन गावांमध्ये कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळले आहेत. या तीन नव्या रुग्णांमुळे ग्रामीण भागातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा 35 वर पोहचला आहे. तर ग्रामीण भागातील 12 रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. 23 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा 73 वर पोहचला असून त्यापैकी 23 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकाच मृत्यू झाला आहे.