ठाणे - लॉकडाऊनच्या काळात म्हणजे २३ मार्च ते २३ एप्रिलपर्यंत महिन्याभरात ६८ विषारी सापांसह २ अजगर मानवी वस्तीत शिरले होते. मात्र, तत्काळ सर्व सापांना कल्याण वनपरिक्षेत्रातील वाॅर रेस्क्यू फॉऊडेशनच्या सर्पमित्रांनी पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून त्यांना जीवदान दिले आहे. लाॅकडाऊनचा काळ त्यातही उन्हाचा पारा चढल्याने विषारी आणि बिनविषारी सापांचा मानवी वस्तीत भक्ष्य आणि थंड ठिकाणाच्या शोधात मानवी वस्तीत शिरकाव केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
एकट्या कल्याण वनपरिक्षेत्रात वाॅर रेस्क्यू फॉऊडेशनच्या सर्पमित्रांनी ३९ कोब्रा नाग, २७ विषारी घोणस, २ मण्यार, २ मांडूळ , २ अजगर, शेड्यूल १ सह २ माकडही मानवी वस्तीतून पकडून त्यांना जीवदान दिले आहे.
लॉकडाऊनच्या काळात निर्मनूष्य झाल्यामुळे अन्न पाण्यासाठी प्राणी मानवी वस्ती आढळून येत आहे. आजच वाॅर रेस्क्यू फॉऊडेशनचे स्वयंसेवक व पोलीस दलात कार्यरत असलेले मुरलीधर जाधव यांनी १० फुट लांबीचा मादी जातीचा अजगर अंबरनाथ रोडवरील चींचोली गावात पकडला. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. रायबोले यांनी प्राथमिक तपासणी करून या मादी अजगरला निर्सगमुक्त करण्यात यावे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डगळे यांनी सांगितले.
दरम्यान, सर्पमित्र हितेश करंजगावकर यांनी आज कल्याण पश्चिम परिसरातील खडकपाडा आणि लालचौकी येथील सोसायटीच्या आवारात २ कोब्रा नाग पकडले आहे. विशेष म्हणजे एका नागाला तर खडकपाडा येथील साईगौरव सोसायटीच्या वाचमनने हिमंत करून शिताफीने प्लास्टिकच्या बादलीत बंद करून त्यावर दगड ठेवला होता. विशेष म्हणजे या लॉकडाऊनच्या महिन्याभरा पकडलेल्या सर्वच विषारी सापांना कल्याण वनविभागांचे वनपाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्र योगेश कांबळे, दत्ता बोंबे, सुहास पवार, हितेश करंजगावकर, गणेश खंडागले, अभिषेक एडके यांनी निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे.