ठाणे - एका आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेला शासकीय रुग्णालयातून कल्याणला जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे या महिलेने आपल्या तीन वर्षांच्या चिमुरड्यासह कळवा ते कल्याणदरम्यानचे २० किलोमीटर अंतर रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास करत पार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शबा शेख असे या महिलेचे नाव आहे.
कल्याण पूर्वेकडील कचोरे येथील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात शबा शेख या पती व तीन वर्षीय मुलासह राहतात. शबा गरोदर असल्याने त्यांनी प्रसूतीसाठी सुरुवातीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णलयात नाव दाखल केले. मात्र, प्रसूती काळात काही आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पुरेशा सुविधा नसल्याचे कारण देत, त्यांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णलयात जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार कल्याणच्या रुख्मिणीबाई रुग्णालयाने रुग्णवाहिकेद्वारे त्यांना कळवा रुग्णालयात पुढील उपचारासाठी सोडले. मात्र, त्याठिकाणी प्राथमिक तपासणीसाठी एक दिवस रुग्णलयात ठेवण्यात आले. त्यानंतर प्रसूतीसाठी वेळ असल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी घरी परत जाण्याचा सल्ला दिला.
अशा स्थितीत आपण परत कसे जाणार? आपल्यासाठी रुग्णवाहिका किंवा वाहनाची व्यवस्था करण्याची विनंती शबा यांनी शासकीय रुग्णालयाकडे केली. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर शबा यांनी एखादे वाहन उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयाबाहेर उपस्थित पोलिसांनाही विनंती केली. परंतु त्यांच्याकडूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर गर्भवती शबा यांनी रेल्वे ट्रॅकवरून चालत कल्याणला येण्याचा निर्णय घेतला. आपल्या सोबत असलेल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन शबाने कळवा ते कल्याण हे २० किलोमीटर अंतर अवघडलेल्या स्थितीत पायपीट करत पार केले.
शबाने घर गाठल्यानंतर परिसरात राहणाऱया समाज सेविका सुवर्णा कानवडे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्याशी संर्पक करून शबाला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. आज सकाळी शबाने खासगी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला असून आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. मात्र, शबासोबत झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे शासनाच्या आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आला आहे.