नवी मुंबई - एपीएमसी मार्केटमध्ये मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणात हापूस आंब्यांची आवक होते. मात्र, यावर्षी हापूस आंब्याची मार्चमध्ये होणारी आवक तुलनेने कमी झाली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम आंबा प्रेमींच्या खिशाला कात्री लावणारा ठरण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यात सर्वांनाच कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याचे वेध लागतात. मात्र, यावर्षी हापूस आंबा कमी येणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. डिंसेबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कोकणात थंडीचा कडाका वाढल्याचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. अती थंडीमुळे आंब्याच्या झाडाला आलेला मोहोर गळून पडला. तर दुसरीकडे थ्रीप्स सारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. याचा फटका हापूस आंबा उत्पादनाला बसला आणि हापूसचे उत्पादन यंदा तब्बल ५० टक्क्यांनी घटले आहे.
दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटी नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये ५० ते ६० हजार हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक होते. मात्र, सध्या ही आवक २५ ते ३० हजार पेटींवर आली आहे. शेतकरी वर्गाबरोबर ग्राहकांनाही याचा फटका बसला आहे. हापूस आंब्याची ४ डझनाची पेटी १५०० ते ३००० रुपयांना विकली जात आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील आंब्याची आवक कमीच राहणार असल्याने आंब्याचे दर कमी होतील याची शक्यता फार कमी आहे.