नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन तसेच पोलीस यंत्रणा नागरिकांना घरी राहा, विनाकारण फिरू नका, एकत्र जमू नका, असे वारंवार सांगत आहे. मात्र, तरीही काही महाभाग बिनधास्तपणे विनाकारण फिरत असतात. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी पनवेल शहर पोलिसांनी ड्रोनचा वापर सुरू केला आहे.
ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या 10 व्यक्तींना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच टेरेसवर जमाव करणाऱ्या सोसायट्यांनाही नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये, म्हणून पनवेल पोलिसांनी ही कठोर पावले उचलली आहेत.
पनवेल परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. हा संसर्गजन्य रोग नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका, जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस आपला जीव धोक्यात घालून अथक परिश्रम घेत आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्याच्या उद्देशाने पाऊले उचलली जात आहेत. संचार आणि जमावबंदीचे आदेश न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. तर, टेरेसवर वाढदिवस साजरा करणाऱ्या नगरसेवकालाही पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात खबरदारी घेण्यात येत आहे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर मेडिकल वगळता इतर दुकाने बंद करण्यात येत आहेत. तसेच बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी तसे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून पनवेल शहर पोलिसांचा खडा पहारा सुरू आहे. त्याचबरोबर गस्तही वाढवण्यात आलेली आहे.
याशिवाय मायक्रो वॉच ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरेही रोज फिरवण्यात येतात. कोरोनासारखा महाभयंकर रोग अनेकांच्या जीवावर बेतत असताना आजही पनवेल शहरात लोक बाहेर फिरत आहेत. हे चित्र ड्रोनच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. बुधवारी साडेपाच वाजता काही व्यक्ती खाडी किनाऱ्यावर असल्याचे ड्रोनमध्ये दिसून आले. त्यानुसार, पनवेल शहर पोलिसांनी एकूण 10 व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे ज्या इमारतीच्या टेरेसवर रहिवासी आढळून आले. त्या सोसायटीच्या कमिटी सदस्यांना नोटीसा देण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचे पालन करून घरातच राहावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी केले आहे.