ठाणे : जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ( Thane Civil Hospital ) रात्रंदिवस रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. जिल्हाभरातून येथे रुग्ण उपचारासाठी येत असल्याने येथील डॉक्टर कामात व्यस्त आहेत. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या उक्तीप्रमाणे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असतात. डॉक्टर कैलास पवार हे जून महिन्यात रुग्णांच्या आरोग्याचा आढावा घेण्यासाठी जात असताना त्यांचा पाय मुरगळला होता.
चार दिवसातच डॉ. पवार कर्तव्यावर हजर : पायाला सूज येऊन प्रचंड वेदना होऊ लागल्या तरीही डॉक्टर पवारांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपले कामकाज सुरू ठेवले. बराच वेळ झाला तरी सूज आणि वेदना कमी होत नसल्याने त्यांनी एक्सरे काढला. तेव्हा त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीचे लहान हाड मोडल्याचे निदान झाले. हे स्पष्ट होताच त्यांच्या पायावर प्लास्टर घालून अस्थीव्यंग तज्ञ डॉ. विलास साळवे यांनी दोन महिन्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला. मात्र, तीन चार दिवसातच कर्तव्यनिष्ठ डॉ. पवार हे आपल्या कर्तव्यावर हजर होते असे, डॉ साळवे यांनी सांगितले.
डॉ.पवार सातत्याने प्रयत्नशील : ठाणे जिल्हा रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीसाठी डॉ. कैलास पवार यांचे मोठे योगदान आहे. ठाण्यातील मानसिक रुग्णालयालगतच्या जागेत हलवण्यात आलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांना उत्तम सेवा मिळावी, यासाठी डॉ.पवार सातत्याने प्रयत्नशील असतात. पायाला गंभीर दुखापत असतानाही डॉ. पवार रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजात मग्न असतात.
अपघातग्रस्तांना मदतीचा हात : गेल्या दीड महिन्यापासून पवार सतत पायाला प्लास्टर लावून रुग्णालयात येत होते. आता प्लास्टर काढून त्यावर मलमपट्टी बांधण्यात आली असून अंतर्गत जखम बरी होण्यास थोडा वेळ लागेल, असे डॉ.साळवे यांनी सांगितले. डॉक्टर पवार आणि त्यांच्या टीमने अनंत अडचणींना तोंड देत रुग्णांना अखंडित सेवा देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यामुळेच शहापूर येथे नुकत्याच झालेल्या समृद्धी महामार्गाच्या दुर्घटनेवेळीही पायाला प्लास्टर न लावता डॉ. कैलास पवार त्यांच्या संपूर्ण टीमसह अपघातस्थळी उपस्थित होते. मुसळधार पावसात मध्यरात्री घटनास्थळी पोहोचून अनेक अपघातग्रस्तांना त्यांनी मदतीचा हात दिला. अनंत अडचणीतही रुग्णसेवेचे व्रत घेतलेले डॉ. कैलास पवार यांच्यासारखा लोकसेवक विरळाच.
सिव्हिल रुग्णालयाचे बांधकाम सुरू : सिव्हिल रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. सिविल रुग्णालयाच्या इमारतीसाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. सिविल इमारतीच्या सोबत त्या ठिकाणी अद्ययावत यंत्रणा अगदी हेलिकॉप्टर लँडिंगची देखील सुविधा रुग्णालयात उपलब्ध करून दिली जाणार आहे. या रुग्णालयावर जवळपास एक हजार कोटींचा खर्च राज्य सरकारकडून केला जाणार आहे.
हेही वाचा -
Konkan Railway : कोकण रेल्वे भारतात येत नाही का? असे का म्हणतात प्रवासी? जाणून घ्या...