ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवलीतील चार रस्त्यावर आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. मनसेने या ठिकाणी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनची दहीहंडी उभारली होती. मात्र, ऐनवेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून हा कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर मनसैनिक खवळले व पोलिसांशी झटापट सुरू झाली. परंतु, पोलिसांच्या ताफ्याने परिस्थिती नियंत्रणात आणून हा दहीहंडी कार्यक्रम ताब्यात घेतला. तसेच ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक दहीहंडीही जप्त केली.
देशभरात ईव्हीएम मशीन विषयी प्रचंड नाराजी असून, आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम मशीनचा वापर न करता बॅलेट पेपरचा वापर करावा, अशी मागणी मनसेने केली होती. ईव्हीएमच्या निषेधार्थ मनसेकडून प्रतिकात्मक दहीहंडी फोडणार असल्याचे सांगण्यात आले.
दहीहंडी उत्सवाच्या दोन दिवस आधी डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांनी हरकत घेऊन मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांना नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्यानंतरही डोंबिवलीत दहीहंडी फोडण्याचा पवित्रा घेऊन राजेश कदम यांनी पोलिसांना आव्हान दिले. या नोटीसला झुगारून मनसेने ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक दहीहंडी बांधली. तसेच 'ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा' अशा आशयाचा मजकूर असलेले टी-शर्ट कार्यकर्त्यांनी परिधान केले. यानंतर दहीहंडी फोडण्यासाठी मनसैनिकांनी मनोरा उभारायला सुरुवात केली. मात्र, पोलिसांचा ताफा उत्सवाच्या ठिकाणी आला व त्यांनी मनसेची ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक दहीहंडी ताब्यात घेऊन कार्यक्रावर नियंत्रण मिळवले.