ठाणे - जिल्ह्यात बऱ्यापैकी कोरोना कंट्रोलमध्ये जरी असता, तरीही कोरोना संसर्ग काळात लागण झालेल्या रुग्णांचे कुटुंबीय, नातेवाईक लागण होण्याच्या भीतीने गाठीभेटी घेणे टाळतात. अशातच कोरोना रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स हेच त्यांची काळजी घेत असल्याचा प्रत्यय स्वर्गीय इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालयात आला.
वयोवृद्ध दाम्पत्य झाले भावुक
सुरवातीच्या काळात भिवंडीत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात पसरला होता. मात्र, गेल्या दोन ते दीड महिन्यांच्या कालावधीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे. तर कोरोनाच्या सुरवातीच्या काळात भिवंडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णांवर उपचार करण्याकरीता राखीव ठेवण्यात आले. याच रुग्णालयात 57 वर्षीय व्यक्ती व त्यांच्या पत्नी हे दोघे ही कोरोना लागण झाल्याने उपचाराकरीता दाखल आहेत. त्यातच 57 वर्षीय व्यक्तीचा काल वाढदिवस असल्याची माहिती उपचार करणारे डॉक्टर्स अमोल शेटे यांना समजताच त्यांनी केक मागवून रुग्णाच्या पत्नीच्या हातून केक भरवून त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या आनंदात डॉ. अमोल शेटे, डॉ. हर्षल मालवाल, वॉर्ड बॉय, नर्स हे सर्वच सहभागी होऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर यावेळी वॉर्डबॉय चक्क नाचू लागले. या अचानक झालेल्या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने वयोवृद्ध दाम्पत्य खूपच भावुक झाले होते.
हेही वाचा- लॉकडाऊनमुळे राणीची बाग बंद, आठ महिन्यात ४ कोटींचा महसूल बुडाला