ठाणे - कोरोनाच्या संकटात पोलीस बांधव स्वतःच्या जीवाची परवा न करता दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा कोरोना वारियर्संना आरोग्य आयुर्वेदिक चहा पाजण्याचे काम ठाण्यातील एक डॉक्टर करत आहेत.
कोरोनामुळे डॉक्टर, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडावे लागते. लॉकडाऊनमुळे पोलीस तर दिवसरात्र सेवेसाठी रस्त्यावर उभे असतात. त्यांच्या चहाची तलफ ठाण्यातील मानसोपचारतज्ञ डॉ. सॅम पीटर पूर्ण करत आहेत. ते दिवसाकाठी ५०० हून अधिक पोलिसांना चहा पाजण्याचे काम करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे पीटर हे पोलिसांना आयुर्वेदीक चहा पाजत आहेत. या चहामध्ये आलं, लवंग, दालचिनी, काळीमिरी आणि लिंबू आदीचे मिश्रण आहे.
पीटर यांनी हे काम 14 मार्च रोजी संचारबंदी लागू झाल्यापासून सुरू केले आहे. ते आजघडीपर्यंत सुरू आहे. ते मेल्वीन फाऊंडेशनच्या माध्यमातून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणारे पोलीस स्टेशन, तीन हात नाका, नितीन जंक्शन आदी ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना चहा देतात.
डॉ. सॅम यांच्या मते, अनेक छोट्या-मोठ्या तक्रारींवर हा आयुर्वेदिक चहा रामबाण इलाज असून सर्दी, डोकेदुखी, घसा व अंगातील बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. केंद्र सरकारने सुचवलेल्या 'आयुष' काढ्याप्रमाणे कोरोनाला जवळ फिरकू न देण्यासाठी हा चहा उत्तम पर्याय ठरू शकतो.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी पीटर यांचा मुलगा मेल्वीन याचा कर्करोगाने मृत्यू झाला. तेव्हापासून ते कार्पोरेट क्षेत्रासह पोलीस बांधवांना मानसिक सक्षमतेचे प्रशिक्षण देण्यासह कर्करोगाबाबत समुपदेशन करत आहेत. सद्या कोरोनाच्या संकटात बहुगुणी चहाचे वाटप करून ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत.
हेही वाचा - कोरोना दक्षता : अवघ्या पाच रुपयांत बनवले 'हॅण्ड सॅनिटाझर स्टॅण्ड'
हेही वाचा - विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीची हत्या, बाथरूममध्ये पडल्याचा केला बनाव