ठाणे: येथील हॅप्पी व्हॅली सोसायटी, मानपाडा येथे राहणारे डॉ. पावन लक्ष्मण साबळे हे सेठ गोर्धनदास वैद्यकीय महाविद्यालय, परळ मुंबई येथे जन औषध वैद्यकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत होते. ते ठाण्याच्या चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते. शनिवारी सकाळी त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. डॉ. पवन साबळे यांनी आत्महत्यापूर्वी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. यानंतर १६ जानेवारी रोजी सेठ गोर्धनदास सुंदरदास यांनी डॉ. पवन साबळे यांना लेखी पत्र देऊन १६ फेब्रुवारी रोजी कार्यालयीन वेळेनंतर राजीनामा ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे कळविले होते. त्यानंतर डॉ. साबळे यांनी आत्महत्या केली. डॉक्टरच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक निधनाची नोंद केलेली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
'अलविदा जिंदगी' म्हणत आत्महत्या: नागपुरातील एका 39 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याची खळबळजनक 19 फेब्रुवारी, 2022 रोजी घटना घडली होती. अभिजित रत्नाकर धामणकर असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव होते. सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या जाचाला कंटाळून अभिजित यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी 'अलविदा जिंदगी' असे स्टेटससुद्धा ठेवले होते.
डॉक्टरविरुद्ध खोटी तक्रार: डॉक्टर अभिजित धामणकर यांचे 2011 मध्ये लग्न झाले होते. मात्र, पहिल्या पत्नीशी मनभिन्नता असल्याने त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 2017 साली डॉक्टर अभिजित यांनी फिजिओथेरपिस्ट असलेल्या विशाखा नामक महिलेसोबत लग्न केले. दुसऱ्या पत्नीसोबत संसार सुरू झाल्यानंतर सासरच्या मंडळीकडून वारंवार हस्तक्षेप सुरू झाला होता. यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले होते. एकमेकांचे पटत नसल्याने विशाखा माहेरी गेली होती. लहान-सहान कारणांवरून त्यांच्यात वाद होत होते. त्यातूनच डॉक्टर अभिजित यांच्या पत्नीने त्यांच्या विरोधात हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी अभिजित विरुद्ध गुन्हासुद्धा दाखल केला होता. संसारात सासरच्या मंडळींची ढवळाढवळ वाढल्याच्या तणावातून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांना आहे.
डॉक्टर महिलेची आत्महत्या: नागपूर शहरातील नरेंद्र नगरच्या उपेंद्र अपार्टमेंट येथे राहणाऱ्या एका डॉक्टर महिलेने 24 डिसेंबर, 2020 रोजी आत्महत्या केली होती. हुंड्याच्या मागणीला कंटाळून या डॉक्टर महिलेने स्वत:चे आयुष्य संपवले असल्याची माहिती समोर आली होती. रुची मंगेश रेवतकर असे डॉक्टर महिलेचे नाव होते. विशेष म्हणजे महिलेचा पती देखील डॉक्टर मंगेश रेवतकर असे त्यांचे नाव होते. रुची यांना माहेरून ५० लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ केला जात होता, अशी तक्रार रुची यांच्या आईने केली होती. या प्रकरणी डॉक्टरला अटक करण्यात आली होती.