ठाणे Diwali Padwa 2023 : हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीला ओळखलं जातं. याच दिवाळीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून पाडव्याला खूप महत्व असतं. पाडव्याच्या दिवशी नागरिक शुभ दिवस म्हणून सोनं खरेदी करतात. पाडवा हा सण पती-पत्नीसाठी महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते. त्यानंतर ओवाळणी म्हणून नवरा एक सोन्याचा दागिना आपल्या पत्नीला भेट म्हणून देत असतो. वर्षानुवर्षे सोनं खरेदीसाठी नागरिक सोन्याच्या दुकानात गर्दी करताना पाहायला मिळतात. ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढलेले असताना देखील ग्राहक या शुभ दिनी सोनं खरेदी करत आहेत.
बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दिवाळी पाडवा हा सोने खरेदीसाठी महत्वाचा मानला जातो. या दिवशी कोणतीही नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रथा परंपरा आहे. यामुळं आज सोन्याच्या बाजारपेठेत ग्राहकांनी एकच गर्दी केल्याचं दिसून आलं. यामुळं व्यापारी वर्गात देखील मोठं आनंदाचं वातावरण आहे. सकाळपासूनच ग्राहकांची सराफ दुकानात सोनं खरेदीसाठी रेलचेल दिसून येत आहे.
दसऱ्यापासून वाढल्या सोन्याच्या किमती : दसऱ्याच्या आधी साठ हजार पाचशे रुपयांवर असलेला सोन्याचा भाव आज साठ हजार 850 इतका झाला आहे. सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली असली, तरी पाडव्याच्या निमित्तानं ग्राहक सोने खरेदी करता आहेत. सोन्याच्या किमती जशा वाढत आहे, त्याप्रमाणे मजुरी देखील वाढत आहे. त्यामुळं सोने विक्रीवर थोडाफार परिणाम झाल्याचं देखील विक्रेते सांगत आहेत.
दिवाळी पाडवा : पाच दिवसांच्या दिवाळी सणाची सुरुवात वसुबारसपासून सुरू होते. दिवाळी भाऊबीजेच्या दिवशी संपते. दिवाळीच्या चौथ्या दिवशी बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा असतो. यंदा 14 नोव्हेंबरला मंगळवारी दिवाळी पाडवा आहे. या शुभदिनी सोनं किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. तसंच अनेक व्यापारी दिवाळी पाडव्यानिमित्त आपल्या जमाखर्चाच्या वह्या, पेन अशा अनेक वस्तूंची पूजा करतात. व्यापारी या दिवसापासून आपले नवीन व्यापारी वर्ष देखील सुरू करतात. याला विक्रमसंवत्सर असं म्हटलं जातं. याशिवाय सुवासिनींकडून पतीची ओवाळणी केली जाते. यामुळं दोघांना दीर्घयुष्य लाभतं, अशी श्रद्धा आहे. लग्नानंतर नवविवाहित जोडप्यांपैकी नवरदेवाला सासरच्या मंडळींकडून खास आमंत्रण मिळतं.
हेही वाचा -