ठाणे - गेल्या काही दिवसांपासून इंधन आणि गॅसची मोठ्याप्रमाणात दरवाढ होत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ उल्हासनगर राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षाच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन केले. यात नागरिकांना शेणाच्या गोवऱ्यांचे वाटप करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
गॅस सिलेंडरला हार घालून दर वाढीचा निषेध
उल्हासनगरच्या नेताजी चौकात हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यापूर्वी मोर्चा काढून राष्ट्रवादीच्या महिलांनी शेणाच्या गोवऱ्या आणि सिलेंडर हातात घेऊन रॅली काढली होती. यावेळी नागरिकांना शेणाच्या गोवऱ्यांचे वाटप देखील करण्यात आले. तसेच सिलेंडरला हार घालून दरवाढीचा निषेध करण्यात आला. सिलेंडर आणि पेट्रोलचे दर वाढल्याने पूर्वी शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक करावा लागत होता. भाववाढीमुळे तीच वेळ आता महिलांवर पुन्हा आल्याचे आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हणले आहे. या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
राज्यभर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून उल्हासनगरमध्येही आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांसह उल्हासनगर शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकणे, हे सरकारला पटते का? - अजित पवार