ठाणे - राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमधील प्रमुख घटक असलेल्या काँग्रेस पक्षाला डावलले जात असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच राज्यातील प्रमुख नेत्यांनी केला होता. आता ठाण्यातील काँग्रेसच्या नेत्यांनीही ही खदखद उघडणे व्यक्त करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीतील ठाण्यातील दोन मंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसने दंड थोपटले आहे.
राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाचे आणि वचनपूर्तीचे बॅनर तीन हातनाका या ठिकाणी लावण्यात आले आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असा उल्लेख न करता थेट ठाकरे सरकारची वचनपूर्ती असा उल्लेख करण्यात आला आहे. तर, बॅनर्समध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधीचा फोटो न लावता तसेच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा फोटो लहान लावण्यात आल्याने काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनीदेखील याच बॅनरच्या बाजूला काँग्रेसचा बॅनर लावला असून यामध्ये सरकार तीन पक्षांचे मग नाव का फक्त दोघांचं? पाठिंबा दिला नसता तर लोकांचे जनकल्याण करणारे ठाकरे सरकार सत्तेवर आले असते का, असा प्रश्न या बॅनरवर विचारण्यात आला आहे.
यावेळी काँग्रेसने पाठिंबा दिला म्हणून ठाण्यात दोन मंत्री झाले आहेत. कालचे मुंगूस आणि साप एकत्र आले असून आम्ही डोंबारी आहोत त्यामुळे, दोघांना कसे नाचवयाचे हे आम्हाला चांगले माहित असल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यातील दोन मंत्र्यांवर केली आहे. तसेच मागेदेखील क्लस्टरवर सेने आणि राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी करण्यात आलेली होती. मात्र, अद्याप क्लस्टर झाले नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. तर याबाबत सेने आणि राष्ट्रवादीकडून बोलण्यास नकार दिला आहे.
ठाण्यात पुन्हा एकदा पोस्टर वॉर सुरू झाला असून ठाणेकरांच्या नजरा या बॅनरकडे लागल्या आहे. ठाण्याच्या तीन हात नका परिसरात ठाकरे सरकारच्या वचन पूर्तीचा बॅनर लागला असून त्याला प्रतिउत्तर म्हणून काँग्रेसने देखील आपल्याला ठाकरे सरकारमध्ये डावलले जात असल्याचा आरोप करीत वचनपूर्ती बॅनरच्या बाजूला बॅनरबाजी केली आहे.
हेही वाचा - ठाण्यात शेकडो मृत्यूनंतरही प्रशासन ढिम्मच; हजारो नागरिकांचे धोकादायक इमारतीत वास्तव्य