ठाणे : अंबरनाथ तालुक्यातील मलंग गडाच्या जवळील कुशीवली गावच्या डोंगर पायथ्याशी शेकडो टाकाऊ घातक केमिकल ड्रम टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची हिल लाईन पोलिसांना माहिती मिळाली. घटनास्थळी धाव घेत तपास सुरु करत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. नियाज खान, मुस्ताक खान, अब्दुल अजीमुल्लाखान आणि रवींद्र यादव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
ड्रमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल -
रत्नागिरी आणि तळोजा या भागातून १२५ केमिकल ड्रम अंबरनाथ तालुक्यातील डोंगर पायथ्याशी विल्हेवाट लावण्यासाठी आणले होते. खळबळजनक बाब म्हणजे या ड्रममध्ये विषारी केमिकल असून त्याची बेकायदेशीररित्या विल्हेवाट लावण्यात आली आहे. या ड्रमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तेव्हा रत्नागिरी व तळोजा येथील रासायनिक कंपनीतून हे ड्रम आणले गेले असल्याचे दिसून आले. आता आरोपींनी हे ड्रम कुठून आणले होते याचा तपास सुरू आहे.
आरोपींना ७ दिवसाची पोलीस कोठडी-
प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कल्याण विभागीय अधिकारी घटनेचा पंचनामा करून पुढील कारवाईची प्रक्रिया करणार आहेत. मागील काही महिन्यांपासून मलंग गड परिसरात रासायनिक केमिकलचे ड्रम जमिनीत पुरणे तसेच मोकळ्या जागी सोडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या माफियांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. अटकेतील चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.