ठाणे - भिवंडी शहरातील निजामपुरा भागातील शासकीय जमिनीवर २००५ सालापासून उभारण्यात आलेली निजामपुरा पोलीस ठाण्याची नवीन इमारत व पोलीस उपायुक्त कार्यालय आणि निवासी इमारत बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. राज्याचे गृह निर्माण विभागाचे पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांनी आपल्या विशेष पोलीस अधिकारी पथकासह आज पाहणी करून ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे.
ठाण्याच्या उभारणीला विरोध करत झाली दोन पोलिसांची हत्या - शासन परवानगी घेऊन नवीन निजामपुरा पोलीस स्टेशनची इमारत शासकीय जमिनीवर बांधण्याचे काम २००५ साली सुरु झाले. मात्र, काही समाजकंठकांनी या पोलीस ठाण्याच्या इमारतीस विरोध दर्शवून दंगल करून दोन पोलिसांची हत्या घडल्यानंतर येथील काम बंद पडले होते. त्यानंतर पोलिसांनी शासनाकडे पाठपुरावा करून हे नवीन पोलीस स्टेशन उभे राहिले आहे.
लवकरच होणार पोलीस स्टेशनचे उद्घाटन - आता पोलीस स्टेशनचे उद्घाटन लवकरच होणार आहे.. त्यासाठी गृहनिर्माण विभाग पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर, अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण आदी पोलीस पथकाने नुकतीच निजामपूर पोलीस स्टेशन तसेच प्रांत कार्यालयाच्या शेजारी पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ चे कार्यालय, तसेच जुनी पोलीस लाईनच्या ठिकाणी पोलीस निवास संकुलाच्या टोलेगंज इमारतीचीही पाहणी केली आहे.