मीरा भाईंदर (ठाणे) - महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे दिनेश जैन यांची निवड झाली आहे. भाजपकडून तीन तर शिवसेनेकडून एक अर्ज दाखल करण्यात आला होता. यामध्ये भाजपचे दिनेश जैन विजयी झाले आहेत. पुन्हा एकदा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक आज पार पडली. भाजपकडून एकूण तीन अर्ज तर सेनेकडून एक अर्ज दाखल करण्यात आला होता. सध्या मीरा भाईंदर भाजपमध्ये दोन गट स्थापन झाले आहेत. मेहता गटाकडून दिनेश जैन तर जिल्हाअध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्या गटातून राकेश शहा व सुरेश खंडेलवाल यांनी अर्ज दाखल केला होता. प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करताना राकेश शाह यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून वैशाली गजेंद्र रकवी यांनी तर अनुमोदक म्हणून सुरेश खंडेलवाल यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. याचवेळी सुरेश खंडेलवाल यांच्या उमेदवारी अर्जावर राकेश शाह यांनी सूचक म्हणून तर वैशाली रकवी यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
हेही वाचा - 'पोहरादेवी येथे नियमांचा भंग झाला, कारवाई होणारच'
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 2007मधील स्थायी समितीसह इतर विषय समित्यांच्या सभापती पदासाठीच्या निवडणुकीकरीता अधिसुचना क्र. बीएनएन 5007/47/प्र.क्र.15/नवि-32 दि.17 फेब्रुवारी 2007 अन्वये निवडणुकी संदर्भात सदरहू अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार कोणताही पालिका सदस्य एकापेक्षा अधिक उमेदवारांची नामनिर्देशने सूचित करणार नाही किंवा त्यास अनुमोदन देणार नाही. त्याचप्रमाणे स्थायी समिती सभापतीच्या नियुक्तीकरीता सूचक किंवा अनुमोदक असणाऱ्या नगरसेवकास सभापती पदासाठी निवडणूक लढविता येणार नाही. तसेच कोणत्याही उमेदवाराला एकापेक्षा अधिक नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास प्रतिबंध केला जाणार नाही, अशीही या अधिनियमात तरतूद आहे. त्यामुळे या अधिनियमातील तरतूद लक्षात घेता निवडणूक निर्वाचन अधिकारी मिलींद बोरीकर यांनी नगरसेवक सुरेश खंडेलवाल आणि राकेश शाह यांचे उमेदवार अर्ज अवैध ठरविले आहेत.
सेनेचा बहिष्कार तर काँग्रेस तटस्थ -
स्थायी समिती सभापती पदासाठी आज झालेल्या निवडणूकीवर शिवसेनेने बहिष्कार घातला तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी तटस्थतेची भूमिका घेतली. त्यामुळे सभापतीपदी भाजपचे दिनेश जैन यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांनी केली आहे.
एकजूट कायम - उपमहापौर
मीरा-भाईंदर शहरातील भारतीय जनता पक्षात कोणत्याही प्रकारच्या गटातटाच्या राजकारणाला थारा नाही. हा पक्ष एकसंघ असून पक्षाची एकजूट आगामी काळात कायम राहणार आहे. त्यामुळेच महानगरपालिकेच्या पुढील सार्वत्रिक निवडणूकीत विरोधकांना धूळ चारीत भाजप पुन्हा एकदा महानगरपालिकेवर आपली सत्ता कायम राखील, असा विश्वास भाजप गटनेते आणि उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी व्यक्त केला.