ठाणे - शिवसेनेच्या महापौर विनिता राणे या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत महासभेतून निघून गेल्याने भाजप नगरसेवक संतप्त झाले. सत्ताधारी शिवसेना महापौर व नगरसेवक अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असून महापौरांनी आजारपणाचे ढोंग करत असल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी महासभा तहकूब करत सभागृहातून काढता पाय घेतला. त्यानंतर अशा बिनकामाच्या सत्ताधाऱ्यासोबत बसण्यापेक्षा उपमहापौर पदाचा राजीनामा देत असल्याचे उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी सांगितले
आज झालेल्या महासभेत उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी बेकायदा बांधकामाबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. महापौर विनिता राणे यांनी लक्षेवधी दाखल करून घेतली. मात्र, काही वेळाने प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या महासभेतून निघून गेल्या. त्यानंतर महापौर उपेक्षा भोईर या पीठासीन अधिकारीपदी विराजमान झाल्या. मात्र, गणसंख्या अपुरी असल्याचे कारण देत सचिवांनी सभा तहकूब करत असल्याचे सांगितल्याने भाजप उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्यासह भाजप नगरसेवक संतप्त झाले. सभागृहात शिवसेना व महापौराविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी निषेध नोंदवला.
शिवसेनेची नेहमीच सावत्रपणाची वागणूक -
शिवसेना नगरसेवक महापौर अधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करतात. भाजप म्हणून आजवर अनेक विषय आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिवसेनेने नेहमीच सावत्रपणाची वागणूक दिली. अनेकवेळा अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांबाबत वेळोवेळी अनेक नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत. परंतु, सत्ताधाऱ्यांना भेटणाऱ्या मलईमुळे कुठल्याही प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यावर कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप भाजपच्या उपमहापौरांनी केला.
डोंबिवलीतील सूतिकागृह, वडवली उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारने 331 कोटीचा निधी 2 वर्षापासून महापालिकेला वर्ग करून देखील महापालिका प्रशासन व सत्ताधारी मिळून एकही काम मार्गी लावण्यात आलेले नाही.
रिंगरूट रस्त्यामध्ये बाधितांच्या पुनर्वसनाबाबत विषय मार्गी लावण्यास टाळाटाळ केली जात आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे आज महापालिकेची अवस्था बकाल आणि भकास झालेली आहे. गेली 4 वर्षे नगरसेवकांच्या फाईल्स गायब होतात. नगरसेवक निधीच्या फाईल मंजूर करण्यासाठी प्रशासन टाळाटाळ करत आहे. बिनकामी सत्ताधाऱ्या समवेत राहण्यापेक्षा पदाचा राजीनामा देत असल्याचे उपेक्षा भोईर यांनी सांगितले.