ठाणे: कल्याण शहरामध्ये गुन्हेगारांचा मुक्त आणि मोकाट संचार आहे. १५ दिवसात तीन गुन्हेगारीच्या घटना खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदार संघातच घटना घडल्या; मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचा वापर फक्त सत्ता संघर्षासाठी करण्याचे ठरवले आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्यांनी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिंदे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये वाढ: सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, शिंदे गटाच्या लोकांना अतिरिक्त सुरक्षा दिली जात असताना अपुरे पोलीस बळ आहे, असे सांगितले जाते. शिवाय कल्याणच्या प्रकरणामध्ये हत्या करणारा आरोपी आदित्य कांबळे याचे वय वारंवार कमी केले जात आहे. त्याला अल्पवयीन ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. डोंबिवलीत विनयभंगाची तक्रार दाखल करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली जाते. याचा अर्थ पोलीस अधिकारी दबावाखाली काम करत आहेत, असा आरोप अंधारे यांनी केला. कल्याणच्या तिसाई गाव परिसरात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची सोसायटीमध्ये घुसून हत्या करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याची टीकाही त्यांनी केली.
आर्थिक गुन्हे शाखेचा मनमानी कारभार: सुजित पाटणकर विषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर अंधारे यांनी उत्तर देत सांगितले की, आर्थिक गुन्हे शाखा त्यांना वाटेल त्या पद्धतीने वाटेल त्याला ताब्यात घेते. गेल्या आठ दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन माध्यान्न भोजन घोटाळ्याची कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेला सादर केली. त्यावर ते काय कारवाई करणार आहे? उज्वल पगार, विजय जाधव यांच्यात कंपन्यांना अनेक वर्षे का कॉन्ट्रॅक्ट दिले जातात? प्रसाद लाड याचा काय संबंध यावर देवेंद्र फडणवीस काही बोलणार आहेत का? आणि किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओ मागील तत्थ अजून बाहेर निघालेत का? यावर त्यांनी विचार केला पाहिजे, असा टोला सुषमा अंधारे यांनी भाजप-शिंदे सरकारला लगावला आहे.
एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका: कल्याणच्या जागेवर भाजपने दावा सांगितलेला आहे आणि ते एक वर्षापासून सुरू आहे. माझा भाचा प्रचंड समजूतदार आणि त्यागशील वृत्तीचा आहे. त्यांचे हिंदुत्वाचे खाते जर तिकडे गेलेले आहेत तर हिंदुत्वासाठी त्यांनी ही जागा हसत हसत सोडून द्यावी, म्हणजे संघर्ष होणार नाही. भाजप किती बिचारी आणि लाचार झालेली आहे, हे चित्र आपल्याला दिसत असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर केली आहे.
हेही वाचा: