ठाणे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेडची मोठी अडचण निर्माण होत आहे. कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने भिवंडीतील सवाद येथील जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालय उभारले असून, तेथे ८१८ बेड आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २७ मार्च रोजी उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. मात्र, उद्घाटनाच्या २० दिवसानंतरही हे रुग्णालय बंद असल्याने रुग्णांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नागरिकांच्या या गैरसोयीची दखल भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी घेतली असून लवकरात हे कोविड जिल्हा रुग्णालय सुरु करण्यात यावे. तसेच त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व औषध पुरवठा करावा, अशी मागणी आमदार शेख यांनी राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आरोग्य कर्मचारी-डॉक्टर अभावी रुग्णालय बंद...
भिवंडी तालुक्यातील सवाद येथील जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयात एकूण २ लाख ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत बनविण्यात आलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयात ३६० महिला ३७९ पुरुष ऑक्सीजन बेड असून तर ८८ अतिदक्षता बेड, ज्यात विभागात २० व्हेंटिलेटर , २० बायपॅक व ४० हाय फ्लो नेझल कॅनुला ऑक्सिजन थेरपी असे सर्व सोयीसुविधा असलेले एकूण ८१८ बेड आहेत. अशा सर्व सोयी सुविधा असलेले हे भव्य जिल्हा कोविड रुग्णालय जिल्हा प्रशासनाने उभारले आहे. मात्र, उद्घाटन होऊन २० दिवसांनातरही हे रुग्णालय बंद अवस्थेत आहे. १० डॉक्टर आणि काही आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याचे भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागरिकांवर आर्थिक संकट...
जिल्ह्यात वाढत्या कोरोना संकटात नागरिकांना कोरोनावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यातच आता कडक निर्बंधांमुळे येथील नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे हे रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.