नवी मुंबई - दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या पनवेलमधील १० जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. आता त्या १० जणांना त्यांच्या घरी होम-क्वारंटाईन केले जाणार आहे.
दिल्लीतील निझामुद्दीन येथे मरकजच्या धार्मिक कार्यक्रमाला देशभरासह विदेशातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती. पनवेलचे १० जण या कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते. यामुळे पनवेल महानगरपालिकेने निजामुद्दीनला गेलेल्या त्या १० जणांचा शोध घेऊन, त्यांना उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले होते.
जिल्हा रुग्णालयात त्या १० जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज त्यांचा अहवाल समोर आला. यात सर्वजण निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि: श्वास सोडला आहे. त्यांना आता पनवेल पालिकेच्या देखरेखीखाली होम-क्वारंटाईन जाणार असल्याचे आयुक्त देशमुख यांनी सांगितलं.