ठाणे - ऑस्ट्रेलियातून मायलेकी आपल्या भिवंडीतील राहत्या घरी आल्या होत्या. मात्र, या मायलेकीला कोरोनाची लागण झाली, असा व्हिडीओ शनिवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. यानंतर भिवंडी शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, या मायलेकीला कोरोनाची लागण झालेली नाही. ही अफवा आहे, असे भिवंडी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात प्रसिद्ध पत्रकही जारी करण्यात आले. तर समाजमाध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल करून अफवा पसरणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक मनोज काटेकर यांनी केली.
ऑस्ट्रेलियातून 20 मार्च रोजी दोघी मायलेकी भिवंडीतील घरी आल्या होत्या. येताना या मायलेकींची मुंबई विमानतळावर रीतसर तपासणी होऊन त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाले. मात्र, खबरदारी म्हणून त्यांनी चौदा दिवस होम क्वारंटाईन करून रहावे, असे सांगत त्यांच्या हातावर तसे शिक्के मारण्यात आले. शनिवारी दुपारी साडेचार वाजल्याच्या सुमारास पालिका वैद्यकीय पथकाला याबाबत माहिती मिळाली. याबाबतीचा व्हायरल व्हिडिओ पाहून नारपोली पोलीस आणि महानगरपालिका आरोग्य विभागाचे पथक मायलेकीच्या घरी दाखल झाले. यावेळी त्यांची चौकशी आणि तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्याबाबतच्या काळजीविषयी समजविण्यात आले. मात्र, यावेळी काहींनी त्या घटनेचा व्हिडिओ काढून तो समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
हेही वाचा - सॅनिटायझरच्या वाढत्या किमतीला सरकारचा चाप, जाणून घ्या 'हा' नियम
या व्हायरल व्हिडिओमुळे त्या मायलेकींना नाहक मनस्ताप होऊन त्यांच्यात नैराश्य पसरल्याचे सांगण्यात आले. तर व्हायरल व्हिडीओ पाहून स्थानिक नगरसेवक मनोज काटेकर यांनी तेथील नागरिकांची समजूत काढून घाबरून न जाण्याचा सल्ला दिला. तसेच होम क्वारंटाईन झालेल्या मायलेकींच्या मोबाईलवर संपर्क साधून धीर दिला. तसेच नारपोली पोलिसांकडे सदरचा व्हीडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
![भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागाने काढलेले परिपत्रक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6495058_bhi.jpg)
दरम्यान, भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. जयवंत धुळे यांनी विदेशातून प्रवास करून शहरात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती महानगरपालिका आरोग्य विभाग घेत आहेत. अशा व्यक्तींना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओचे वृत्त खोटे आहे. अद्यापही भिवंडी शहरात कोरोनाग्रस्त एकही रुग्ण नसल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.