ठाणे : राज्यात ऑनलाइन टास्कच्या नावाखाली पैसे लुटण्याचा धंदा जोरात सुरू आहे. ठाण्यात एका 66 वर्षीय वृद्धाची सायबर गुन्हेगारांनी 17 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. त्याला ऑनलाईन टास्कसाठी पैसे देण्याची ऑफर देण्यात आली होती, असं पोलिसांनी आज सांगितलं. ही घटना नवी मुंबईतून समोर आली आहे. या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
उत्पादनांसाठी रिव्ह्यू सोशल मीडियावर पोस्ट : या गुन्ह्याबद्दल बोलताना पोलिसांनी सांगितले की, या वृद्ध व्यक्तीशी 4 जणांनी संपर्क साधला होता. त्यांनी आपण एका उच्च ई-कॉमर्स कंपनीचे प्रतिनिधी असल्याचा दावा केला होता. त्यांनी त्याला वेगवेगळ्या उत्पादनांसाठी त्याचे रिव्ह्यू सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितले. या कामासाठी त्यांनी त्याला पैसे देऊ केले होते. त्या व्यक्तीने त्यांच्यावर विश्वास ठेवला. या व्यक्तींनी जेव्हा तक्रारदारास पेमेंट करण्यास सांगितले, तेव्हा त्याने एप्रिल ते मे 2023 पर्यंत अनेक हप्त्यांमध्ये 17 लाख रुपये दिले होते. सुरुवातीला त्याने केलेल्या पोस्टसाठी त्याला काही पैसे देण्यात आले. परंतु नंतर त्याला पैसे मिळणे बंद झाले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं या वृद्ध व्यक्तीच्या लक्षात आलं.
अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल : त्याच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 420 आणि 34 आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हेगारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दिवसेंदिवस अशा घटनांचे प्रमाण वाढत आहे.
यापूर्वीची घटना : अशीच आणखी एक घटना यापूर्वी देखील ठाण्यात घडली होती. ऑनलाईन पार्टटाईम जॉबच्या नावाने तरुणाला साडेचार लाखांचा गंडा सायबर चोरट्यांनी घातला होता. जूनमध्ये ही घटना घडली होती. हा तरूण नोकरीच्या शोधात होता. त्याला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता. या मेसेजमध्ये त्याला पार्टटाईम नोकरीची ऑफर देण्यात आली होती.
हेही वाचा :
- Cyber Emissaries In Nashik: नाशिकमध्ये सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अनोखा उपक्रम; पोलीस आयुक्तांनी उभी केली सायबरदूतांची फौज
- Devendra Fadnavis News : सायबर गुन्हेगारी मोडून काढणार - देवेंद्र फडणवीस
- Juice Jacking Scam : स्मार्टफोन चार्जिंगला लावताच बँक खाते होईल साफ; 'अशी' घ्या तुमच्या मोबाईलची काळजी