ठाणे - भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील सुप्रसिद्ध बकरी बाजार कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लागू केलेल्या संचारबंदी व लॉकडाऊन काळातही खुलेआम सुरू आहे. त्यामुळे गावात कोरोना संसर्ग पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे बाजाराच्या दिवशी या ठिकाणी शेकडोच्या संख्येत बकरे खरेदीदारांची झुंबड दिसून येत आहे.
परराज्यातील बकरे विक्रीला
कोनगाव येथील बकरी बाजार हा संपूर्ण जिल्ह्यात सुप्रसिद्ध असून मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवसात भरणाऱ्या या बकरी बाजारात बकरे विक्रीसाठी गुजरात, राजस्थान ,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातून मोठ्या संख्येने व्यापारी येत असतात तर दुसऱ्या दिवशीच्या मटण विक्रीसाठी अनेक खरेदीदार मटण विक्रेते खाटीक या ठिकाणी बकरे खरेदीसाठी येत असतात. सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना या ठिकाणी मोठ्या गर्दीत व कोरोना संसर्ग टाळण्यासाठीच्या उपाययोजनांकडे पाठ करून सामूहिक अंतराची ऐशीतैशी करत असल्याने परिसरात कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका संभवत आहे
इतर ठिकाणचे आठवडी बाजार, व्यवसाय बंद
बकरी बाजारात बकरे खरेदीसाठी भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई भागातून व्यापारी, मटण विक्रेते येत आहेत. परंतु या बाजारात येणाऱ्या एका ही व्यक्तीची कोरोना चाचणी केली जात नाही. त्यामुळे कोनगावात आतापर्यंत थैमान घालणाऱ्या कोरोनास आयते निमंत्रण दिले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. बाजाराच्या दिवशी हजारो नागरिक ज्यामध्ये व्यापारी खरेदीदार, अडते मध्यस्थ असे लोक येत असताना त्यापासून करोना संसर्ग वाढू शकतो, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाने कोरोनासंसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन जाहीर करताना अनेक गाव खेड्यातील आठवडी बाजार, व्यवसाय बंद करण्याची कारवाई स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून केली जात असताना या बकरी बाजारावर स्थानिक प्रशासन अथवा स्थानिक पोलीस कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही हे विशेष.
बकरी बाजाराला राजकीय पाठबळ
खासदार कपिल पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या एका स्थानिक पुढारी हा बकरी मंडईचा मालक असून त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवत बिनधास्तपणे संचारबंदीत शेकडोंच्या संख्येने टेम्पो, ट्रकमधून बकऱ्यांची वाहतूक करून बाजाराच्या दिवशी हजारो बकऱ्यांची खरेदी विक्री या ठिकाणी होत असते, विशेष म्हणजे कोरोना नियमाचे कुठलेही पालन न करता, बकरी मंडईत मोठ्या प्रमाणात गर्दीत होऊन कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागात पसरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या बकरी मंडईमुळे फैलाव होणाऱ्या कोरोना आजाराची गंभीर दखल तातडीने घेऊन बकरी मंडईवर कारवाईचे स्थानिक प्रशासनाला आदेश द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.