ठाणे - सोनारांनी दिलेले 3 किलो सोने घेऊन कारागीर फरार झाल्याची घटना उल्हासनगर येथील सोनार गल्लीत घडली. हे आरोपी पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - लातुरात कीर्तनकाराचा खून की अपघात? खडगाव परिसरात खळबळ
तीन सोनारांनी दोन कारागीर बंधूना 3 किलो 700 ग्रॅम सोने घडनावळीसाठी दिले होते. या सोन्याची सुमारे 1 कोटी 42 लाख 45 हजार रूपये किंमत आहे. कारागीर हे सोने घेऊन पसार झाले आहेत. ही घटना उल्हासनगरातील कॅम्प नं. 2 येथील सोनार गल्लीत घडली. विश्वजीत डे व सुजीत डे असे सोनं घेऊन पसार झालेल्या आरोपींची नावे असून ते पश्चिम बंगालचे रहिवाशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरातील कॅम्प २ येथील सोनार गल्लीत आरोपी विश्वजीत डे व सुजीत डे या दोन भावांचे सोने घडनावळीचे दुकान आहे. ते चांगल्या प्रकारचे कारागीर असल्याचा विश्वास त्यांनी सोनार गल्लीत निर्माण केला होता. त्यामुळे मोहन घनशानी, नवीन वलेचा, विक्रम लखवानी या तीन सोनारांनी त्या दोन कारागीरांना ३ किलो ७०० ग्रॅम सोने सुमारे १ कोटी ४२ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे सोने घडनावळीकरता विश्वासाने दिले होते.
कारागीरांचा सोनारांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, आढळून आले नसल्याने अखेर मोहन घनशानी यांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून विश्वजीत डे व सुजीत डे या दोन कारागीरांविरूध्द तक्रार दाखल केली आहे. सुमारे १ कोटी ४२ लाख ४५ हजार रूपये किंमतीच्या सोने पळवून नेणाऱ्या दोन कारागीरांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. ते दोघेही पश्चिम बंगाल येथील मुळ राहणारे असल्याने ते त्याठिकाणी पळाले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करत आहेत.
हेही वाचा - जालन्यातून आठ मोटार सायकलींसह चोराला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश