ठाणे - ठाणे शहरातील लसीकरणाच्या वेळेचे स्लॉट बूक करण्याच्या प्रकारात गैरप्रकाराची शक्यता लक्षात घेऊन या प्रकरणी सायबर पोलिसांकडून चौकशी करावी. तसेच, संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपचे गटनेते व जेष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली.
हेही वाचा - कल्याण, डोंबिवलीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ४०२ जणांचा मृत्यू
ठाणे महापालिकेने झोपडपट्टीतील काही केंद्रे वगळता संपूर्ण केंद्रांचे ऑनलाईनद्वारे नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही दिवसांपासून अवघ्या काही सेकंदातच स्लॉट बूक होत आहेत. या प्रकारात हॅकींगचा संशय व्यक्त करणारे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे. त्यातून एकाच वेळी ग्रुप बुकिंग होत असल्याचाही संशय आहे. त्यामुळे, या प्रकाराची गंभीर दखल घेऊन महापालिकेने पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर एकाच वेळी ग्रुप बुकिंग करणारे आयपी अॅड्रेस, फोनच्या आयएमईआय क्रमांकावरून गुन्हेगारांना गजाआड करावे. त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी डुंबरे यांनी केली. या कारवाईत महापालिका प्रशासनाने सामान्यांचे हित ध्यानात घ्यावे, असे आवाहनही डुंबरे यांनी केले.
ते ठराविक कोण ?
कोविन अॅपद्वारे ठाण्यातील लसीकरण केंद्रे बुक करण्याची लिंक काही ठराविक व्यक्तींकडे आधी असल्याचा संशय आहे. त्यामुळे, ते ठराविक कोण आहेत, त्याचा उलगडा पोलिसांकडूनच होऊ शकेल, असे डुंबरे यांनी पत्रात म्हटले.
दुसऱ्या डोससाठीही ऑनलाईन स्लॉटद्वारे बुकिंग करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. ठाण्यात दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत असलेले हजारो नागरिक आहेत. त्यातील बहुतांशी जेष्ठ नागरिक तंत्रस्नेही नाहीत. त्यातच ठाण्यातील केंद्रांवर मुंबई, नवी मुंबई, पनवेलमधील नागरिकांची गर्दी होती. अशा परिस्थितीत ठाण्यातील जेष्ठ नागरिक दुसरा डोस मिळेल की नाही? याबद्दल हवालदील आहेत, याकडे डुंबरे यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा - भाईंदर पूर्वेच्या कॅनरा बँकेत भीषण आग