ठाणे - नवजात बालकाची २ लाखांत सौदेबाजी करून खरेदी विक्री करणाऱ्या ६ जणांवर मानपाडा पोलिसांनी फौजदारी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये जन्मजात मुलाची आईही सामील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शीतल मोरे असे आईचे नाव आहे. तर दीपक सिंग असे नवजात बालक विकत घेणाऱ्याचे नाव आहे. तसेच कल्पना, लक्ष्मी कोंडले, इंदू सूर्यवंशी, अमोल व्हलेकर असे सौदेबाजी करणाऱ्यात सहभागी असलेल्याची नावे आहेत.
हेही वाचा - पतीकडून पत्नीचा व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह स्टेट्स ; पोलिसात तक्रार केल्यानंतर तोंडावर फेकले अॅसिड
घरच्या गरिबीला कंटाळून नवजात मुलाची विक्री -
शीतल मोरे ही महिला मूळची शिर्डी नजीक असलेल्या इमानवाडीची राहणारी आहे. ६ सप्टेंबर रोजी शिर्डीच्या एका खासगी रुग्णालयात नवजात मुलाला तिने जन्म दिला. यावेळी मात्र तिच्याकडे रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी पैसे नव्हते. यादरम्यान तिची मावशी कल्पना हिने साडे आठ हजार रुग्णालयाचे बिल भरून घरी आणले. त्यानंतर मावशीने तिला मूल विकण्याचा सल्ला देत, लाखो रुपये मिळतील गरिबी दूर होईल असे सांगितले. त्यामुळे शीतल मुलाची विक्री करण्यासाठी तयार झाल्याने कल्याण पूर्वेतील राहणाऱ्या ओळखीची महिला लक्ष्मी हिच्याकडे मावशी व नवजात बालकासह ती आली होती. त्यानंतर इंदु सुर्यवंशी व लक्ष्मी यांच्यात मूल विकण्याबाबत बोलणं झाले. त्यातच मुंबईत राहणाऱ्या दीपक सिंग याला मुलबाळ नसल्याने त्यांनी मुलाला २ लाखात विकत घेण्याची तयारी दर्शवली आणि इंदु सुर्यवंशी हिच्याकडे २ लाख दिले. त्यावेळी इंदुने लक्ष्मीकडे शीतलला देण्यासाठी १ लाख रुपये रोख पाठवले. शीतलला १ लाख रुपये रोख मिळाल्यानंतर बाकीची रक्कम मिळावी म्हणून इंदूकडे तगादा लावला असता ६० हजार इंदूच्या बँक खात्यातून आणि त्यानंतर २८ हजार इंदूचा भाऊ अमोलच्या खात्यातून दिले.
१२ हजारामुळे प्रकार आला समोर -
दोन लाखात नवजात बालकाची सौदेबाजी ठरली त्याप्रमाणे मुलीच्या आईला १ लाख रुपये दिले. त्यानंतर ८८ हजार दिले. मात्र, महिना उलटून गेला तरीही शीतलला ठरल्याप्रमाणे १२ हजार दिले नाही. त्यामुळे तिने विकत घेणाऱ्या मागे तगादा लावला होता. मात्र, १२ हजार मिळत नसल्याचे पाहून तिने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता हा बेकायदा विक्रीचा खळबळजनक प्रकार सामोर आला. त्यामुळे पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून नवजात बालकचा शोध घेत सौदेबाजी करणाऱ्या ६ जणांविरोधात पोलीस उप निरीक्षक गणेश सिताराम मुसळे यांच्या तक्रारीवरून कोणतीही कायदेशिर प्रक्रिया पूर्ण न करता बालकाची विक्री केल्याने आईसह सहा जणांवर बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम सन 2015 चे कलम 80, 81 सह भा.द.वि कलम 34 अन्वये तक्रार दाखल करून त्यांच्याकडील नवजात बालक ताब्यात घेतले.
हेही वाचा - सचिन वाझेचा ताबा ईडीला द्यायला न्यायालयाचा नकार