ठाणे Thane Crime News : दारू पिण्यास पैसे दिले नाही याचा राग आल्याने, सनी धर्मवीर बैद (वय 32 वर्ष), राहणार भैय्यापाडा रामनगर, वागळे इस्टेट ठाणे या दारुड्याने विजय चौहान (वय 29) याची हत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.
दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार : या घटनेतील मयत विजय चौहान हा रविवारी पहाटेच्या सुमारास डगलाईनच्या नाल्याजवळ, रामनगर येथे लघुशंका करण्याकरता गेला होता. यावेळी तेथे आरोपी सनी धर्मवीर बैद हा दारूच्या नशेत होता. त्याने विजयकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी विजयने दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग येऊन आरोपी सनी धर्मवीर बैद याने त्यास ठार मारले. आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकत गुन्ह्यात वापरलेलं साहित्य जप्त केलं. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात (Shrinagar Police Station) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला 24 तासात अटक : हत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर लागलीच पोलिसांनी आपली सूत्रे हलवत घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी बद्दल माहिती मिळवली. त्यानंतर हत्या करणाऱ्या मद्यपी आरोपीला 24 तासाच्या आत अटक केलं. पोलिसांनी लागलीच सूत्रं हलवल्यामुळे आरोपीला अटक करण्यात यश आलं.
प्रियकराने केली हत्या : याआधीही ठाण्यात अशीच एक घटना घडली होती. 'लिव्ह इन' रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ३८ वर्षीय विवाहित प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत प्रियकराने तिचा राहत्या घरातच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती . ही घटना कल्याण पूर्व विजयनगर आमराई परिसरात असलेल्या एका चाळीच्या घरात घडली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolshewadi Police) प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या.
हेही वाचा -