ठाणे : मुंब्रा पोलिसांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये व्यापाऱ्याकडून जप्त करण्यात आलेल्या पैशातून हिस्सा मिळावा यासाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये संवाद सुरू आहे. ही कथित क्लिप सध्या व्हायरल होत आहे.
कथित ऑडिओ क्लिप व्हायरल : पोलिसांनी एका व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकून 30 कोटी रुपये जप्त केले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी दोन कोटी रुपयांची रक्कम ठेवण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप संबंधित व्यावसायिकाने केला होता. याप्रकरणी 10 पोलिसांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. ही कथित घटना 12 एप्रिल 2022 रोजी घडली होती. तब्बल वर्षभरानंतर या प्रकरणाचा निकाल लागणार असे वाटत असतानाच या प्रकरणाने नवे वळण घेतले असून ऑडिओ क्लिप समोर आली आहे.
किमान ५० लाख तरी द्या : संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये दोन पोलीस संवाद साधत आहेत. या प्रकरणात काहीही संबंध नसताना आपल्याला गोवण्यात आल्याचा आरोप पोलीस करत आहेत. साहेबांकडे दोन कोटी पडले आहेत, पण साहेब काहीच द्यायला तयार नाहीत. साहेबांकडे असलेल्या दोन कोटींपैकी किमान ५० लाख तरी आपल्याला द्यावेत, असा संवादही ऐकायला मिळतो.
निलंबित अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता : घटनेच्या दिवशी आपण सीसीटीव्ही समोर बॉक्स फोडायला नको होता, असे देखील एक कर्मचारी म्हणत आहे. कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर पोलीस मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. या कथित ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर निलंबित अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खेळणी विक्रेत्याकडून 15 कोटी जप्त : ही घटना घडली तेव्हा खेळणी विक्रेत्याकडून 15 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. त्यातील जप्त रक्कम पोलीस ठाण्यात एका बॉक्समधून काढण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. त्यानंतर पोलिसांची विभागीय चौकशीही करण्यात आली होती. त्यात दहा पोलीस अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. तसेच त्यातील चौघांना क्लीन चिट दिली होती.
पैशांवर व्यापाऱ्याने पाणी सोडले : या प्रकरणातील पैसे एका मोठ्या व्यापाऱ्याचे आहेत. आपल्या मागे आयकर विभाग, ईडीची चौकशी लागू नये यासाठी त्या पैशांवर व्यापाऱ्याने पाणी सोडले आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये माझे नाव घेऊ नका, अशी विनंती देखील व्यापाऱ्याने चौकशी अधिकाऱ्यांना केली आहे. याचाच फायदा घेत मुंब्रा पोलिसांनी हे पैसे गायब करण्याचे काम केले, असा आरोप होत आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी देखील मॅनेज केल्याचा आरोप या व्हायरल कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे.