ठाणे: गेल्याच महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यातील 10 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली होती. यानंतर तो मुंबई पोलिसांच्या कोठडीत होता. आता मात्र खंडणी प्रकरणात अनिल जयसिंघानी हा नवी मुंबईतील तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
कोट्यवधींची मालमत्ता उघडकीस: 'ईडी'कडून जयसिंघानीला ताब्यात घेण्यात आले होते. अनिल जयसिंघानी विरुद्ध 'मनी लाँड्रिंग' प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जयसिंघानीशी संबंधित १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध मालमत्ता शोधल्या आहेत. त्यामध्ये बहुतांश मालमत्ता हॉटेल, फ्लॅट, दुकाने, जमीन पार्सल आणि इतर स्थावर मालमत्तांच्या स्वरूपात आहेत. जयसिंघानी आणि त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे सहकारी यांची अनेक बँक खातीही 'ईडी'ने उघडकीस आणली आहेत. यामध्ये कोट्यवधींचा बेहिशेबी पैसा जमा करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.
टॉप बुकींच्या यादीत जयसिंघानी: अनिल जयसिंघानी गेल्या सात ते आठ वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर 16 गुन्हे दाखल आहेत. सट्टेबाजीच्या प्रकरणात तीनदा अटक करण्यात आली होती. जयसिंघानी हा दुबई, कराची आणि दिल्लीतील सट्टेबाजी सिंडिकेटशी संबंधित असल्याचेही समजते. तो देशातील 'टॉप बुकी' मानला जातो. गेल्याच महिन्यात 'ईडी'कडून झालेल्या तपासादरम्यान जयसिंघानीची बेकायदेशीर सट्टेबाजीतून खरेदी केलेली मालमत्ता 100 कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. तर 'ईडी' अधिकारी मुंबई, ठाणे आणि दुबईतील काही परदेशी खेळाडूंसह काही बड्या बुकींमधील संबंधांची चौकशी करत आहेत.
पत्रकार ते इंटरनॅशनल बुकी: अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणारी अनिक्षा ही अनिल भगवानदास जयसिंघानी याची मुलगी असल्याचे नुकतेच समोर आले. जयसिंघानी पत्रकारितेच्या आडून इंटरनॅशनल बुकी बनला, अशी माहिती समोर आली आहे. जयसिंघानीने माजी पोलिस उपायुक्त अमर जाधववर साप्ताहिकाच्या माध्यमातून मोठे आरोप केले होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशीला सुरूवात झाली आहे तसेच बदनामीच्या मागे कोण आहे, याचा देखील पोलिस शोध घेत असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पत्रकारितेच्या आडून गोरखधंदा: विशेष म्हणजे अनिल जयसिंघानी उर्फ सुनील सिल्वर एकीकडे बुकीचा गोरखधंदा करीत असतानाच, ‘ॲटम’ आणि ‘टाऊन दर्शन’ नावाने दोन साप्ताहिक काढून त्याचा संपादक म्हणून बातम्या प्रसिद्ध करत होता. त्यातच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त शंगारी हे भ्रष्ट्राचारी असून त्यांचे हफ्ता कलेक्टरचे म्हणून पोलीस उपआयुक्त अमर जाधव काम करतात, अशी बातमी साप्ताहिक ‘ॲटम’ मध्ये २००१ साली प्रसिद्ध केली होती.
हेही वाचा: |