ठाणे - अर्धांगवायु असलेला कोविड रुग्ण ग्लोबल इम्पॅक्ट या covid-19 च्या हॉस्पिटलमधून गायब झाल्याची घटना घडली. नातेवाईकानी रुग्णाची चौकशी केली असता तो त्या रुग्णालयात कोठेच आढळला नाही. यामुळे त्याच्या नातेवाईकांनी रग्णालयावर हलगार्जिपणाचा आरोप केला असून प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
ठाण्यातील ग्लोबल इम्पॅक्ट हबमध्ये सुरू केलेल्या covid-19 च्या हॉस्पिटलमधून एक रुग्ण गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 29 जूनला या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना बाळकुम येथील ग्लोबल इम्पॅक्ट या covid-19 च्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून रुग्णासंदर्भात काहीही ही माहिती उपलब्ध न झाल्याने शेवटी आज रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये येऊन विचारणा केली. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने संपूर्ण हॉस्पिटल पालथे घातले. मात्र हा रुग्ण कुठे सापडला नाही.
हा रुग्ण 71 वर्षांचा असून त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने स्वतःहून चालता येत नाही. अशा परिस्थितीत रुग्ण गायब कसा होऊ शकतो असा सवाल रुग्णाच्या नातेवाईकांनी विचारला आहे. आज ठाणे महानगरपालिकेच्या दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या हॉस्पिटलला भेट दिली. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी यासंदर्भात घडलेला प्रकार त्यांना सांगितला. या प्रकारास संदर्भात लवकरात लवकर शोधकार्य करून कारवाई करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या आहेत.