नवी मुंबई - कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी संकल्पनेने व्यापक प्रचार मोहीम सुरू केली. टास्क फोर्सच्या माध्यमातून महाराष्ट्रात कोरोना विरोधात लढा सुरू आहे. त्यात माझी सोसायटी माझी जबाबदारी या संकल्पनेने यश पॅराडाईस हाउसिंग सोसायटीने उभारलेले कोविड सेंटर हे महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरेल. विजय चौगुलेंच्या माध्यमातून एक नवीन संकल्पनेचा उगम झाला असून इतर सोसायटींनीही या आदर्श उदाहरणाचे बोध घ्यावा, असे आवाहन नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांच्या माझी सोसायटी माझी जबाबदारी या संकल्पनेने ऐरोली, सेक्टर ८ येथील यश पॅराडाईज सोसायटीमध्ये सुविधायुक्त असे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे व राज्यस्तरीय कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. राहूल पंडीत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा खासदार राजन विचारे उपस्थित होते.
सोसायटीमध्ये कोविड सेंटर उभारण्याची पहिलीच घटना -
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करीत नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी माझी सोसायटी माझी जबाबदारी या संकल्पनेतून व ॲप्पल हॉस्पिटलच्या मदतीने ऐरोली, सेक्टर ८ येथील यश पॅराडाईज सोसायटीमध्ये सुविधायुक्त असे कोविड केअर सेंटर उभारले आहे. यामध्ये ५ आयसीयू बेड्स, ५ व्हेटिलेटर, १६ ऑक्सिजन बेड असे एकूण २६ बेड्स असून ६ डॉक्टर व १६ नर्स असा स्टाफ असणार आहे. सोसायटीतील कोरोना रुग्णास परिवाराच्या जवळ व सुसज्ज, सोयीसुविधा युक्त अशा कोविड सेंटरमध्ये उपचार घेता येणार असल्याने एक आधार ठरणार आहे. सोसायटीमध्ये अशा प्रकारचे कोविड सेंटर उभारण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात विजय चौगुले यांच्या संकल्पनेची स्तुती होत आहे.
सोसायटीमध्ये वाढते कोरोना रुग्ण पाहता घेतला निर्णय -
यश पॅराडाईज सोसायटीमध्ये कोरोनाच्या महामारीत साठ ते सत्तर रुग्ण आढळून आले होते. त्यातील सात ते आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही बाब लक्षात घेता नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे याकरीता सोसायटीच्या कमिटीने कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. हे सेंटर उभारत असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आवश्यक असणारे परवाने मिळवून देण्यासाठी मदत केली. त्यामुळेच आज हे कोविड सेंटर उभे राहिले आहे. तसेच प्रत्येक राजकीय नेत्याने मतदारांच्या मतांवर डोळा न ठेवता, कठीण काळात अशा प्रकारचे समाजपयोगी कामे करून दाखविल्यास जनतेला नक्कीच फायदा होऊ शकतो, असे विजय चौगुले यांनी सांगितले.
हेही वाचा - पालघरच्या वडराई समुद्रात अडकलेल्या १३७ जणांना वाचवण्यात यश