ठाणे - भिवंडीमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, मंगळवारी शहरातील वेताळपाडा येथे दोन महिलांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. आज शहरातील मानसरोवर परिसरात औरंगाबाद, कन्नड येथून उपचारासाठी येऊन भावाकडे राहिलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली आहे. दरम्यान, आज (बुधवारी) आढळलेल्या या रुग्णामुळे आता भिवंडी शहरातील एकूण रुग्णांची संख्या ६ झाली आहे.
कोरोनाग्रस्त रुग्ण राहत असलेला परिसर देखील सील करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असून, हा रुग्ण ज्या रुग्णालयात डायलेसीसाठी गेला होता ते रुग्णालय देखील सील करण्यात येण्याची कारवाई करावी सुरू केली आहे. त्याच बरोबर रुग्णाच्या घरातील ४ चार जणांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती देखील डॉ. धुळे यांनी दिली आहे.
भिवंडीतील ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. कशेळी येथील ठाणे मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील क्वारंटाईन केलेल्या तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डावकर यांनी दिली आहे. कशेळीत राहणारे ठाणे मनपाच्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना क्वारंटाईन केंद्रात पाठविण्यात आले होते. या कुटुंबातील क्वारंटाईन केलेल्या पाच जणांपैकी ९१ वर्षीय आईसह सून आणि मुलगी या तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती डॉ. डावकर यांनी दिली आहे.
कोनगाव परिसरात एक कॅन्सरग्रस्त महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या देखील आता ७ वर पोहोचली आहे. त्यामुळे शहरात ६ आणि ग्रामीण भागात ७ अशी एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे.