ठाणे : 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या हत्याप्रकरणी विवाहित प्रियकरला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय जे. मंत्री यांनी मृताच्या सहा वर्षाच्या मुलाची साक्ष ग्राह्य धरून या शिक्षेसह ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ओमप्रकाश शितलाप्रसाद कौल (Omprakash Shitlaprasad Kaul) उर्फ आदिवाशी (वय ३४) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. तर सोनिया कुत्तु आदिवाशी (वय ३०) असे हत्या (Sonia Kuttu Adivasi Murder Case) झालेल्या प्रेयसीचे (Thane Court News) नाव आहे.
प्रेयसीची केली हत्या : सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमप्रकाश हा भिवंडी तालुक्यातील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भाड्याच्या खोलीत राहत होता. त्यावेळी त्याचे सोनिया कुत्तु यांच्याशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर दोघे 'लिव्ह इन'मध्ये राहत होते. आरोपी ओमप्रकाश हा कमाईतील काही पैसे मूळ गावी राहत असलेल्या पत्नीला पाठवत होता. सदर बाब मृत सोनियाच्या लक्षात आली होती. त्यामुळे ती ओमप्रकाशशी या कारणावरून सतत भांडत होती. मात्र, हा वाद ३१ जुलै २०१८ रोजीच्या मध्यरात्री विकोपाला जाऊन ओमप्रकाशाने सोनियाची हत्या केली होती.
सोनियाला बेदम मारहाण : या प्रकरणी ओमप्रकाशविरुद्ध कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटकेनंतर पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली होती. आरोपी ओमप्रकाश याने सोनियाला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर तिची हत्या केली. खोली मालकाच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून कोनगाव पोलिसांनी तपास सुरू करून आरोपीची कारागृहात रवानगी केली होती.
प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा - आरोपीला शिक्षेसाठी सुनावणी दरम्यान तपास पोलीस अधिकारी व्ही.के. देशमुख यांच्यासह हवालदार वैभव चव्हाण यांनी न्यायालयासमोर पुरावे आणि १२ साक्षीदार न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा - Mumbai suicide: धक्कादायक! वडील फक्त ओरडले; 16 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल