ठाणे - केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे १५ एप्रिल पर्यंत बाहेरील देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी व्हिसाचे नियम कडक केले आहेत. या नियमाचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसला. केंद्र सरकारच्या या नियमामुळे भारताचे ६० विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकले आहेत. यात मुंबई आणि ठाण्याच्या विद्यार्थांच्या समावेश आहे. त्यांना भारतात परत आणण्यासाठी खासदार राजन विचारे यांच्यासह शिवसेना खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तेव्हा मोदींनी त्या विद्यार्थ्यांना लवकरच भारतात आणले जाईल, असे सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण -
भारताचे ६० विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी फिलिपाईन्सला गेले होते. पण, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी मनिला येथून कॉललाम्पूरमार्गे मुंबईत येण्याचा मार्ग स्वीकारला. मंगळवारी संध्याकाळी मलेशियात पोहोचलेल्या या विद्यार्थ्यांना मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाने बुधवारी सकाळी सिंगापूरला आणण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाची तिकीटही देण्यात आली. बुधवारी दुपारी मुंबईकडे येणाऱ्या विमानाचे बोर्डिंग पास घेण्यावेळी या विद्यार्थ्यांना विमानात प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे ते विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकून पडले आहेत.
नमिता म्हात्रे या विद्यार्थिनीने आपली अडचण पालघर युवा सेना विस्तारक राहुल लोंढे यांना फोनवरुन सांगितली. तेव्हा लोंढे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याची माहिती दिली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी खासदार राजन विचारे व शिवसेना खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यास सांगितले होते.
राजन विचारे आणि शिवसेना खासदारांनी मोदी यांची भेट घेतली. तेव्हा मोदींनी त्या विद्यार्थांना लवकरच भारतात आणले जाईल, असे सांगितलं. त्या विद्यार्थांना बोर्डिंग पास मिळाले असून लवकरच ते मुंबईला येणार आहे. दरम्यान, त्या विद्यार्थ्यांनी फोनवरुन शिवसेनेचे आभार मानले आहेत.