ठाणे : मीरा भाईंदर शहरात कोरोनाची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर दुसरीकडे शहरातील कोरोनातून मुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असून आतापर्यंत ३ हजार ३९० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, मीरा भाईंदर क्षेत्रातील कोरोनाबधितांच्या एकूण आकड्यात ४ हजार ६३३ रुग्णांची नोंद झाली आहे.
मीरा भाईंदर शहरात २७ मार्चरोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तर ६ एप्रिल रोजी पहिल्या रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची नोंद झाली होती. त्यानंतर मीरा भाईंदर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली परंतु, शहरातील कोरोनामुक्त झालेल्यांची टक्केवारी ७३.१७ असून ३.७१ टक्के मृत्यू दर आहे. तर सध्या २३.१२ टक्के रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवारी मीरा भाईंदरमध्ये १६२ नव्या रुगांची नोंद झाली तर, ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यूदेखील झाला आहे. तसेच १७६ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत मीरा भाईंदरमध्ये ४ हजार ६३३ रुग्णांची नोंद झाली असून एकूण १७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण ३ हजार ३९० जणांनी कोरोनावर मात केली आहे. मीरा भाईंदर शहारत कोरोनाच्या संख्येत वाढ होत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील चांगली आहे.