ठाणे - कोरोनाच्या काळात अनेकजण माणूसकी विसरल्याचे चित्र आतापर्यंत अनेकदा पाहायला मिळाले आहे. मात्र, आता प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकलीला आणि तिच्या वडिलांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. चाळीतील लहानसे घर आणि आई कोरोनाबाधित असल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. आरोग्य यंत्रणेशी अनेकदा संपर्क साधूनही कोरोनाबाधित व्यक्तीला रूग्णालयात नेण्यासाठी कुणी आले नाही, असा आरोप मुलीचे वडील आणि नागरिकांनी केला आहे.
काय आहे प्रकरण -
कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांना घरात बसावे लागले आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. अनेक ठिकाणी रूग्णवाहिका वेळेवर येऊ शकत नाही. याचा फटका नागरिकांना बसत आहे. अशा परिस्थितीत एका खोलीच्या घरात राहणाऱ्या कोरोनाबाधितांच्या कुटुंबियांनी करायचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ठाण्यातील चाळीत राहणाऱ्या एका महिलेला कोरोनाची लागण झाली. तिच्या पतीने याबाबत ठाणे महानगरपलिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून रूग्णवाहिकेची आणि बेडची मागणी केली. मात्र, त्यांना फोनवर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यांना एक लहान मुलगी आहे. आई कोरोनाबाधित असल्याने तिचे वडील त्या मुलीला घेऊन रस्त्यावर थांबले आहेत. महानगरपालिकेशी संपर्क करून १२ तास उलटले तरी त्यांच्याकडून मदत मिळालेली नाही.
आता करायचे काय, वडिलांपुढे मोठा प्रश्न -
छोट्याश्या घरात राहणाऱ्या या व्यक्तीने आता करायचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आपल्या लहान मुलीला कोरोना होऊ नये, यासाठी पत्नीला घरात ठेवून मुलीला घेऊन घराबाहेर राहण्याची वेळ या व्यक्तीवर आली आहे. रूग्णवाहिका येईल आणि माझ्या आईला उपचारासाठी रूग्णालयात घेऊन जातील या आशेने ही चिमुरडी आपल्या बापाबरोबर वाट पाहत आहे. महानगरपालिकेच्या या वर्तणुकीवर नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राग व्यक्त केला आहे.
हेही वाचा - राज्यात 58 हजार 952 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 278 रुग्णांचा मृत्यू