नवी मुंबई - पनवेल परिसरातील कोरोनाबाधित रुग्णाची रवानगी मुंबईतील कस्तुरुबा रुग्णालयात करण्यात येते. त्यामुळे रायगडमधील रुग्णांची सोय व्हावी, या अनुषंगाने पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 'कोरोना कोविड 19' रुग्णालयाची जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतीच पाहणी केली.
पनवेलमधील 120 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आता जिल्हा कोविड रुग्णालय म्हणून ओळखले जाणार आहे. या रुग्णालयात पूर्णतः विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे, हे रुग्णालय सर्वतोपरी सुसज्ज ठेवण्यात आले आहे. या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांना तपासणीसाठी व प्राथमिक उपचारांसाठी जवळच्या महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात पाठविले जाणार आहे. या रुग्णालयात रायगड जिल्ह्यातील 'कोविड 19'चे रुग्ण ठेवण्यात येणार आहेत.