ठाणे : उन्हाळा सुरू झाला आहे. त्यातच पानगळतीला सुरुवात झाल्यामुळे झाडे देखील उजाड दिसू लागली आहेत. परंतु या उजाड झाडांवर वर्षभर न दिसणारे पक्षी हमखास दिसत आहेत. या दिवसात स्थलांतरित पक्ष्याबरोबर मुंबई, ठाण्यात 'तांबट पक्षी' सर्वाचे लक्ष वेधतो आहे. हा पक्षी सहसा कोणाला दिसत नाही. झा़डावर टूक टूक असा आवाज काढत हा चिमुकला पक्षी पानांच्या आड बसलेला असतो. निसर्गाने या पक्ष्याला हिरवा, लाल, काळा, पिवळा अशा विविध रंगांची उधळण केल्याने, पक्ष्याला बघता क्षणी प्रेमात पडत असल्याची माहिती पक्षी अभ्यासक मंदार बापट याांनी दिली.
तांबट पक्षाचे तीन प्रकार : तांबट पक्ष्याचे तीन प्रकार आहेत. कॉपर स्मिथ बारबेट, तपकिरी डोक्याचा तांबट (ब्राऊन हेडड बारबेट) आणि पांढऱ्या गालाचा तांबट (व्हाईट चिक बारबेट) असे प्रकार आढळून येतात. यापैकी कॉपर स्मिथ बारबेट मुंबई ठाणे शहरात सर्वत्र आढळतो, तर तपकिरी डोक्याचा तांबट हा संजय गांधी राष्ट्रिय उद्यान तर पांढऱ्या गालाचा तांबट हा पश्चिम घाटात दिसतो. आपल्याकडे दिसणारा तांबट पक्ष्याला रसाळ फळे खायला भरपूर आवडतात. काहीवेळा छोट्या किटकांवर ताव मारतो. एरवी गर्द झाडांमध्ये लपून बसलेला असतो, परंतु सध्या पानगळतीचा हंगाम असल्याने हा पक्षी वड, पिंपळ, उंबर, जांभूळ अशा झाडांवर बसलेला दिसतो.
कसा असतो तांबट पक्षी : भारताचा राष्ट्रीयपक्षी मोर, राज्यपक्षी हरीयल तसेच मुंबईचा तांबट पक्षी अशी वेगळी ओळख आहे. साधारण चिमणीच्या आकाराचा म्हणजे १९ सेमी लांबीचा हा पक्षी आहे. तांब्याच्या हंडीवर हातोड्याचा घाव घातल्यावर जसा आवाज येतो, तशाच पद्धतीने हा ओरडतो, त्यामुळे स्थानिक भाषेत याला तांबट असे नाव पडले असावे, असे सांगितले जाते. हा पक्षी शक्यतो वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, अशा स्थानिक झाडांवर राहणे पसंत करतो. सुकलेल्या फांदीवर चोचीने टोचून बिळ (घरटं) तयार करतो. फेब्रुवारी ते एप्रिल विणीचा हंगाम असतो. नर, मादी दोघे पिल्लांची काळजी घेतात. पिल्ले घरटे सोडून गेली की चिमणी, दयाळ व इतर लहान पक्षी त्या पोकळीमध्ये आपले घरटे तयार करतात.