ठाणे: पंकज यादव (३५) असे अटक हवालदाराचे नाव आहे तर बसवराज गर्ग (५६) असे हत्या झालेल्या रेल्वे सुरक्षा दलातील सब इंस्पेक्टरचे नाव आहे. मृतक बसवराज गर्ग हे अंबरनाथ रेल्वे स्थानक विभागात कार्यरत होते. तर आरोपी हवालदार पंकज यादव हा रेल्वे सुरक्षा दलात रोहा रेल्वे स्थानक विभागात कार्यरत आहे. त्यातच दोघेही कल्याण रेल्वे सुरक्षा दलात २०१९ साली कार्यरत असताना सब इंस्पेक्टर बसवराज गर्ग यांनी आरोपी हवलदाराचे वेतनवाढ तीन वर्षांसाठी रोखण्याचा अहवाल वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. तेव्हापासूनच आरोपी यादव हा सब इंस्पेक्टरसह त्यांना मदत करणाऱ्या आणखी तिघांच्या हत्येचा कट रचून होता.
उपनिरीक्षक धावले मदतीला, पण... (काल) बुधवारी रात्री दहा वाजता मृत सब इंस्पेक्टर गर्ग हे त्यांच्या रेल्वे वसाहत मधील निवासातील घरातील खोलीत बिछान्यावर पडून होते. तर त्यांचा एक सहकारी उपनिरीक्षक राकेशकुमार त्रिपाठी हे घराच्या बाहेर काम करत होते. तेवढ्यात त्रिपाठी यांना दूरवरुन अंधारातून एक इसम त्यांच्या खोलीत गेल्याचे जाणवले. खोलीतून ओरडल्याचा आवाज आल्याने उपनिरीक्षक त्रिपाठी हातचे काम टाकून पळत खोलीत गेले. त्यांना सब इंस्पेक्टर बसवराज गर्ग पलंगावरुन खाली पडल्याचे दिसले. यावेळी एक इसम पलंगाला मच्छरदाणीसाठी लावलेली लोखंडी सळई काढत होता. पलंगाच्या बाजूला उशी, चादर, लाकडी दांडके पडले होते. हा प्रकार पाहताच त्रिपाठी यांनी बाहेर येऊन आपल्या सहा सहकाऱ्यांना ओरडून आवाज दिला. त्यावेळी एस. एस. शेटे, संतोष पटेल, मंगेश उमाशंकर कुर्मी हे तेथे धावत आले.
लाकडी दांडक्याने हत्या : घटनेनंतर हल्लेखोर हवलदार घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, हल्लेखोराला पळून जाताना इतर रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिले होते. उपनिरीक्षक त्रिपाठी यांनी पळून गेलेला इसम कोण अशी विचारणा सहकाऱ्यांना केली. त्यांनी तो रेल्वे सुरक्षा बलातील हवालदार पंकज यादव आहे असे सांगितले. बसवराज गर्ग यांच्यावर हल्लेखोराने लाकडी दांडक्याने हल्ला केल्याने रक्ताच्या थारोक्यात घरातच जमिनीवर पडले होते. त्यानंतर सोबत राहणाऱ्या सहकाऱ्यांनी बसवराज यांना गंभीर अवस्थेत तात्काळ कल्याण मधील रेल्वे रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
24 तासात आरोपीला अटक : रेल्वे सुरक्षा दलातील पोलीस उपनिरीक्षक त्रिपाठी यांच्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. आरोपी हवालदार हा चिपळूणच्या दिशेने गेल्याची खबर शोध पथकाला लागली होती. त्यामुळे शोध पथक चिपळूणला रवाना होताच आरोपी हवालदार हा पेण रेल्वे स्थानकानजीक असलेल्या रेल्वेच्या बॅरेकमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. अखेर पोलीस पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे, वेतनवाढ रोखण्यासाठी आणखी तिघांनी मदत केल्याचा राग आरोपी हवालदाराच्या मनात होता. त्यामुळे सब इंस्पेक्टर बसवराज गर्ग यांच्या हत्येनंतर तो त्या तिघांचाही खून करण्याच्या तयारीत होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
हेही वाचा : sugarcane fire News: शॉर्टसर्किटमुळे जळाला ऊस; आगीत शेतकऱ्यांचे नऊ लाख रुपयांचे नुकसान