मीरा भाईंदर (ठाणे)- मीरारोड परिसरातील काँग्रेस नगरसेवक राजीव मेहरा यांनी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. सत्ताधारी भाजपच्या मनमानी कारभारा विरोधात हे उपोषण करत असल्याची माहिती मेहरा यांनी दिली.
मीरा रोड परिसरात मीरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून शितल नगर ते शांती नगरादरम्यान गटाराचे काम सुरू असून ते काम चुकीच्या पद्धतीने केले जात आहे. गटारे रस्त्यापेक्षा उंच असल्यामुळे पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. परिणामी परिसरातील व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरण्यासारख्या घटना घडतात. त्यामुळे प्रशासनाने या कामाकडे लक्ष देऊन ते काम योग्य पद्धतीने करून घ्यावे अशी मागणी नगरसेवक मेहरा यांनी केली आहे.
फ्लॅटधारकांच्या घरात पाणी-
दरवर्षी शितल नगर शांती नगर परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले जाते. अनेक वर्षापासून पावसाळ्यात येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच रस्त्याची उंची जास्त असल्याने येथील दुकाने आणि रहिवाशांची घरे सखल भागात झाली आहेत. त्या शिवाय गटारांचे कामही रस्त्यापेक्षा उंच होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात फ्लॅटधारकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे विकास आराखड्यात ज्या प्रमाणे रस्त्यांचे नियोजन आहे, त्याच प्रमाणे त्यांचे काम व्हायला हवे, यामागणीसाठी काँग्रेस नगरसेवक राजीव मेहरा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पालिकेचे दूर्लक्ष-
मीरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे आणि शितल नगर शांती नगर मधील रहिवाशांना वेठीस धरले जात आहे. दरवर्षी मीरा रोड मध्ये पावसाळ्यात पाणी साचले जाते,अनेक वर्षांपासून मनपा प्रशासन तक्रार केली जाते. मात्र पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे, अशी माहिती माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी दिली.