ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर' हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाच्या काही दिवस आधी तो रिलिज झाला. आता या चित्रपटाचा पार्ट २ येणार आहे. यासाठीचा मुहूर्त आज (सोमवार, २७ नोव्हेंबर) झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता प्रसाद ओक तसंच निर्माते मंगेश देसाई उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला : यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला. हा चित्रपट काही लोकांना खटकला. काही लोक चित्रपट चालू असताना मध्येच उठून गेले, तर काहींना चित्रपटातील काही प्रसंग आवडले नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र सिनेमाबाबत कोणाला काहीही वाटो, आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोण काय बोलतात हे आम्हाला ऐकायची गरज नाही, असं ते म्हणाले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी धर्मवीर चित्रपटाच्या स्क्रिनिंगला संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं.
माझं भविष्य सांगणारे थकलेत : आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. सुरुवातीला हे सरकार पडणार अशी भविष्यवाणी केली गेली. त्यानंतर आता मुख्यमंत्री बदलणार अशी चर्चा सुरू झाली. आता तर भविष्य सांगणारेही थकलेत. कारण माझ्या पाठिशी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आशीर्वाद आहेत, असं शिंदे म्हणाले. 'मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे' अशा घोषणा काही लोक करत होते. मात्र नरेंद्र मोदी यांनी मंदिर बांधूनही दाखवलं अणि उद्घाटनाची तारीखही सांगितली, असं म्हणत त्यांनी सर्वांना अयोध्येला जाण्याचं आवाहन केलं.
शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन : यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेल्या जिल्ह्यांमध्ये तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले. हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्यांना लवकरच मदत करू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
हेही वाचा :