ठाणे : वाहतूक कोंडीमुळे कोपरी पुलावरून मुंबईकडे वाहन चालवत जाण्यायेण्याचा त्रास नको, असेच काहीसे मत गेली अनेकवर्षे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे होते. अरुंद कोपरी पुलामुळे दररोज सकाळ आणि संध्याकाळी इथे होणाऱ्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा फटका सर्वांनाच केव्हा ना केव्हा बसला आहे. कामानिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना तर या यातना दररोच्याच झाल्या होत्या. काही मिनिटांच्या अंतरासाठी तासंतास वाहन चालकांना गाडीत बसून काढावा लागत असे. यावर तोडगा काढत ठाणे महानगरपालिका आणि पालकमंत्र्यांनी रेल्वे प्रशासनाची परवानगी मिळवत कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले.
सहाच महिन्यात रस्त्याला खड्डे : तब्बल वीस वर्षे आणि अडीचशे कोटींचा निधी खर्च करून हा पूल तयार करण्यात आला. परंतु सहाच महिन्यात सर्व पितळ उघडे पडले आहे. अवघ्या सहा महिन्यात या पुलावरील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने, पावसाचे पाणी आत झिरपून पूल कमजोर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही बाजूला लावलेल्या चुकीच्या बॅरिकेट्समुळे हा पूल आता मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे, असे जाणकार सांगत आहेत. प्रशासनाने मात्र रस्त्याच्या डागडुजीचे काम होत असल्याचे सांगितले आहे.
१३ कोटींचा खर्च २५० कोटी : २००3 सालापासून या पुलाच्या कामाची मागणी होते आहे. त्यावेळेस या कामाचा खर्च हा १३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र रेल्वे प्रशासन पालिका आणि राज्यसरकार यांच्यात नियोजन होत नसल्यामुळे, हा पुल रखडला. दरम्यानच्या काळात दररोजची वाहतूक कोंडी आणि त्रास यावर अनेक आंदोलने झाल्यानंतर अखेरीस, २०१८ साली या पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली. तसेच पूल पूर्ण होण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी लागला.
मनसेने कामाच्या दर्जावर उभे केले होते प्रश्नचिन्ह : या पुलाचे बांधकाम सुरू असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भेगा पडलेल्या रस्त्यांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या विरोधात आंदोलन देखील करण्यात आली होती. त्यावेळेस प्रशासनाने तेवढा भाग दुरुस्त करून काम पुढे सरकवले होते. आता याच कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून कामाचा दर्जा योग्य नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत.
हेही वाचा -