ठाणे - भिवंडी-वसई रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या मार्गावर मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने पनवेल-भिवंडी-वसई या मार्गावर दोन नव्या रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू असून या मार्गात जमीन अधिग्रहण व माती भराव असे काम सुरु आहे. मात्र माती भराव करणाऱ्या ठेकेदारांनी नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही दखल घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे बेजबाबदारपणे माती भरावाचे काम करणाऱ्या प्रसाद रोड अँड इन्फ्रा या ठेकेदाराला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना द्याव्यात, नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देश करावे, अशी मागणी वडघर ग्रामस्थांनी भिवंडीचे प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांच्याकडे केली आहे.
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
माती भराईसाठी खोदलेल्या या खड्ड्यात कंत्राटदाराने माती भराई केली नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची सुरक्षा देखील या खड्ड्याभोवती केलेली नाही. त्यातच मागील आठवड्यात पडलेल्या पावसात हा खड्डा पाण्याने पूर्ण भरला असून या खड्ड्याला तलावाचे रूप आले आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा-'यास' चक्रीवादळामुळे गोंदिया मार्गे जाणाऱ्या 16 रेल्वे गाड्या रद्द