ठाणे - भिवंडी शहरात ज्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, त्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी प्रशासनाने हाती घेतली आहे. तपासणी करुन सतत 14 दिवस त्याचा आढावा घेण्याचे काम आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन करत आहे. मात्र, काही भागातील नागरिकांच्या डोक्यातील सीएए आणि एननआरसीचे भूत अजूनही उतरलेले नाही. आमची माहिती कशासाठी घेतली जाते, असा जाब आरोग्य विभागाच्या पथकाला विचारून त्यांना पिटाळून लावले जात आहे. त्यामुळे नागरीकांच्या अशा वर्तणुकीमुळे भिवंडी शहरात कोरोना विषाणूला रोखणार कसे? असा प्रश्न महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला पडला आहे.
कोरोना विषाणूची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्याने महाराष्ट्रात विशेष दक्षता घेऊन प्रशासन आणि आरोग्य विभाग काम करत आहे. भिवंडीत 12 एप्रिलनंतर कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना क्वॉरेंटाईन सेंटरमध्ये दाखल करून एक किलोमीटर परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली. याच ठिकाणी आरोग्य विभागाचे स्वयंसेवक सतत 14 दिवस भेट देऊन त्यांचा अहवाल तयार करत आहेत. मात्र, काही मोहल्ल्यांमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यास नकार दिला जात आहे. त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना पिटाळून लावले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
खंडूपाडा अन्सार मोहल्ला या भागात माहिती घेण्यासाठी डॉक्टरांसह गेलेल्या पथकातील महिलांना स्थानिक नागरीकांनी गर्दी करून अडवून ठेवले होते. आम्हाला माहिती द्यावयाची नाही, ही माहिती सिएए आणि एनआरसीसाठी घेतली जात असल्याचा आरोप करत पथकाला पिटाळून लावले. विशेष म्हणजे या पथकातील कर्मचारी नागरीकांना गर्दी करून उभे राहू नका या बाबत विनंती करत होते. तरीही शेकडो नागरीक तोंडाला मास्क न लावता गर्दी करून उभे होते.
वेळीच योग्य ती खबरदारी घेतल्याने शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. रुग्ण आढळलेल्या भागात आरोग्य पथकामार्फत केल्या जाणाऱ्या तपासणीला विरोध होत आहे. अशा ठिकाणी स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने तेथील नागरीकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही माहिती घेणे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असून, आपले शहर करोनामुक्त करण्यासाठी घेतली जात असल्याचे समजावण्यात येत आहे. यामुळे नागरीकांचा विरोध काही प्रमाणात मावळला असून ते सहकार्य करत असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली.