ठाणे - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज (दि. 13 जून) डोंबिवली युवा सेनेतर्फे उस्मा पेट्रोल पंप येथे एक रुपयात एक लिटर पेट्रोल, असा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी तरुणांची सकाळपासून भली मोठी रांग लागली आहे. पेट्रोलचा दर आज 102 रुपये प्रति लिटर असताना एक रुपयात एक लिटर पेट्रोल मिळत असल्याने नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे स्वस्त पेट्रोल उपक्रमाच्या माध्यमातून भाजपला शिवसेनेने चपराक दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे. तसेच केंद्र सरकारलाही डिवचवण्याचा प्रयत्न केला आहे.
अंबरनाथमध्ये 50 रुपये लिटर
अंबरनाथ पश्चिमेकडील विमको नाक्यावरील पेट्रोल पंपावर सकाळी 11 ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास येणाऱ्या वाहनचालकासाठी 50 रुपये प्रति लिटरने पेट्रोल देण्यात आले. दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला वारंवार शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहेत. एकीकडे हे राजकारण सुरू असताना नागरिकांना दोन तास का होईना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - मध्य रेल्वे मालवाहतूक ट्रेनच्या तपासणीची जबाबदारी आता महिलांकडे