ठाणे - मोठ्या आवाजाच्या आणि प्रदूषण पसरविणाऱ्या फटाक्यांना ठाणे महापालिकेने बंदी घातलेली आहे. त्यावर पर्याय म्हणून यंदा बाजारात बच्चे कंपनीसाठी चॉकलेटचे फटाके आणि मिठाई उपलब्ध झाली आहे. यामुळे बच्चे कंपनी या चॉकलेट फटाक्यांकडे आकर्षित झाली आहे.
सध्या बाजारात विविध फटाक्यांच्या स्वरुपात असलेल्या चॉकलेट मिठाईची भर पडलेली आहे. फटाकेच आहेत की काय, असा भास निर्माण होईल, अशी ही मिठाई आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गिफ्ट म्हणून देण्यासाठी फटाका चॉकलेटला पसंती दिली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने सण उत्सव साजरे करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी फटाके फोडले जातात. त्यानिमित्ताने फटाक्यांची दुकानेही सजलेली असतात. यंदा महापालिकेने ठाणेकरांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. फटाके विक्रीवर बंदी नसली तरी, फटाके वाजविण्यावर बंदी असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि वातावरण दूषित होऊ नये म्हणून महापालिकेने सूचक पावले उचलली आहेत. लहान मुलांना फटाके आणि चॉकलेट दोन्ही आवडीचे असल्याने त्यांच्यासाठी फटाका चॉकलेटची मिठाई ही संकल्पना बाजारात आली आहे. ही सकंल्पना तन्वी पांगारे यांची आहे. त्यांनी फटाक्यांच्या विविध प्रकारचे चॉकलेट बनविले आहे. लहान मुलांबरोबर या फटाका चॉकलेटला कार्यालयात गिफ्ट्स म्हणून देण्यासाठीही पसंती दिली जात असल्याचे पांगारे यांनी सांगितले.
हेही वाचा - दिवाळीत चीनी लायटिंगचाच बोलबाला, देशी लायटिंगपेक्षा तीनपट विक्री
स्वस्त असल्याने चांगला प्रतिसाद -
हा चॉकलेटच्या फटाक्यांचा बॉक्स 150 रुपयांचा आहे. त्यात डार्क आणि मिल्क चॉकलेट, 250 रुपयांच्या बॉक्समध्ये ड्रायफ्रूट, डार्क आणि मिल्क चॉकलेट तर 350 रुपयांच्या बॉक्समध्ये ड्रायफ्रूट, डार्क आणि मिल्क चॉकलेटसह कंदिल चॉकलेट तर हॅप्पी दिवाळीचा टॅगिंग लावलेले चॉकलेट यात पाहायला मिळत आहे. मिठाईला पर्याय म्हणून हे चॉकलेट बनविले असल्याचे तन्वी पांगारे यांनी सांगितले.
बच्चे कंपनी खुश
या फटका मिठाईला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या ठिकाणी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दीदेखील होत आहे. हा अनोखा प्रयत्न बच्चे कंपनीला पसंत पडल्याचे चित्र आहे.