ठाणे : Children Missing Case : कल्याणमधील रामबाग परिसरात राहत असलेली तीन भावंड शाळेत जातो सांगून घरातून बाहेर पडली. ती शाळेत न जाता कल्याण रेल्वे स्थानकात येऊन तेथून आसनगाव लोकलने खडवली येथे नदीवर पोहचली. मात्र, घरी परतीचा प्रवास कसा करावा हे समजले नसल्याने ती खडवली परिसरात भटकत होती. तर दुसरीकडे मुले बेपत्ता झाल्याची तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल होताच, तीन भावंडांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि पालकांनी तत्काळ हालचाली केल्या. अखेर ही मुले खडवली रेल्वे स्थानकात सुखरूप सापडल्याने मुलांच्या पालकांचा जीवात जीव आला.
नदीत पोहण्यासाठी शाळेला मारली बुट्टी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या रामबाग भागात राहत असलेल्या विजय तुंबर यांची दोन मुलगे, एक मुलगी जोशीबाग भागातील एका शाळेत शिक्षण घेतात. बुधवारी दुपारी ही मुले नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली. शाळेच्या प्रवेशव्दारावर त्यांना शिक्षकांनी पाहिले. शाळेला दांडी मारण्याच्या विचारात असलेल्या या मुलांनी मौजमजेसाठी पालकांना न सांगताच खंडवली नदीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शाळेत न जाता ही मुले कल्याण रेल्वे स्थानकात येऊन आसनगाव लोकलने खडवली रेल्वे स्थानकात उतरली आणि बाजुलाच असलेल्या भातसा नदीवर गेली. तेथे नदीत डुंबण्याचा आनंद लुटल्यानंतर संध्याकाळी ती घरी परतण्यासाठी खडवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली. परंतु ती रस्ता चुकली आणि खडवली भागात फिरत राहिली.
मुले बेपत्ता झाल्याने पालक चिंतेत : दरम्यान, शाळेत गेलेली मुले घरी आली नाही म्हणून तुंबर कुटुंबीयांनी त्यांचा शाळा, घराच्या परिसरात शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाहीत. मुले बेपत्ता झाली आहेत म्हणून विजय तुंबर यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी तपास पथके तयार केली. शाळा, कल्याण रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी तपासले. यानंतर मुले कल्याण रेल्वे स्थानकातून आसनगाव लोकलने खडवली येथे गेल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी मुलांचा ताबा घेऊन केले पालकांच्या स्वाधीन : पोलिसांनी खडवली नदी, रेल्वे स्थानक भागात मुलांचा शोध सुरू केला. त्यावेळी खडवली रेल्वे स्थानक भागात ही मुले भटकत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी तात्काळ मुलांचा ताबा घेतला. या मुलांची चौकशी केली असता त्यांनी आम्ही खडवली नदीवर मौजमजेसाठी आलो होतो. घरी परताना रस्ता चुकलो. त्यामुळे आम्ही येथेच अडकून पडलो, असे सांगितले. पोलिसांनी या मुलांना कल्याणमध्ये आणून पालकांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा: