ठाणे - सार्वजनिक शौचालयास आईसोबत जाताना भरधाव दुचाकीच्या धडकेत ३ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील पंजाबी कॉलनी परिसरात आलेल्या शास्त्रीनगर येथील रस्त्यावर घडली आहे. खुर्शीद रसीद अंसारी असे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दुचाकीस्वरावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अभिषेक जैसवार (वय,२२) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे.
घरात शौचालय नसल्याने चिमुरडा गेला जीवाशी
मृत चिमुरडा उल्हासनगर शहरातील पंजाबी कॉलनी परिसरात असलेल्या एका चाळीत आईवडिलांसह राहत होता. त्याच्या घरात शौचाची व्यवस्था नसल्याने हे सर्व कुटूंब घरानजीक असलेल्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. नेहमीप्रमाणे मृत चिमुरड्याची आई त्याला परवा रात्री ८ च्या सुमारास सार्वजनिक शौचालयात हाथाला पकडून नेत होती. त्याच सुमारास भरधाव वेगात तीन दुचाकीस्वार मद्यधूंद अवस्थेत दुचाकी चालवत मागून येऊन त्यांनी चिमुरड्याला जोरदार धडक दिली. चिमुरडा खाली पडला असता त्याच्या अंगावरूनही आरोपीने दुचाकी नेऊन पसार झाले. तर चिमुरड्याचा अपघात होताच आईने स्थानिकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने दुसऱ्या दिवशी कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी चिमुरड्याची आई सबीरूनीसा रफीक अंसारी यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलिसांनी भादवी कलम 304 A, 279, 338 आणि मोटर वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करत आहेत.
मद्यधूंद अवस्थेत भरधाव दुचाकीमुळे अपघात
घटनेच्या दिवशी आरोपी मद्यधूंद अवस्थेत असल्याची माहिती मृतक चिमुरड्याच्या आईने दिली आहे.